प्रतिनिधी/ पणजी
शिक्षण संचालकपदावरून वंदना राव यांना हटवण्यात आले असून तो पदभार उपसंचालक संतोष आमोणकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर श्रीमती राव यांना अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी (उत्तर गोवा) नेमण्यात आले आहे. त्यांच्याकडे गोवा इनव्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाचे सीईओ पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. अबकारी कर आयुक्तपदी शशांक मनी त्रिपाठी यांची नेमणूक करण्यात आली असून क्रीडा युवा व्यवहार खात्याचे संचालक म्हणून अतिरिक्त भार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. पर्सनल खात्याचे अवर सचिव शशांक ठाकूर यांनी हा आदेश जारी केला आहे.
उचलबांगडीसाठी होता दबाव
वादग्रस्त ठरलेल्या शिक्षण खात्याच्या संचालिका वंदना राव यांची काल अखेर तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी संतोष आमोणकर यांची शिक्षण खात्याचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संध्याकाळी उशिरा हा आदेश जारी करण्यात आला. शिक्षण खात्याच्या संचालकपदावर राव यांची उचलबांगडी करण्यात यावी यासाठी सरकारवर दबाव होता. विरोधकांसह सरकारमधील एक मंत्री मायकल लोबो यांनीही राव यांच्यावर उघडपणे टीका केली होती.
राज्यपालांपर्यंत प्रकरण
वंदना राव या शिक्षण खात्याच्या संचालक म्हणून अपयशी ठरत असल्याची टीका विरोधकांनी चालविली होती. विद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे पगार संस्थानीच उचलावे अशा प्रकारचे एक परिपत्रक हल्लीच जारी करण्यात आले होते. त्या वरूनही सरकारवर जोरदार टीका झाली होती. गोवा फॉरवर्डने या विषयावरून सरकारवर उघडपणे टीका केली होती. राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. त्यानंतर परिपत्रक मागे घेण्यात आले. हल्लीच सरकारमधील एक मंत्री मायकल लोबो यांनी वंदना राव यांच्यावर उघडपणे टीका केली होती. शिक्षण खात्याकडून घेण्यात येणारे चुकीचे निर्णय आणि त्यावरून सरकार विरोधात होणारी टीका या कारणामुळे अखेर त्यांची शिक्षण संचालक पदावरून उचलबांगडी करण्यात आली. या आदेशानंतर गोवा फॉरवर्डने आपली मागणी मान्य झाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला.