प्रतिनिधी/ पणजी, मडगाव
चिंबल- इंदिरानगर येथील 29 वर्षीय तरुण कोरोनाचा बळी ठरला. काल सोमवारी 196 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर 143 जण कोरोनामुक्त झाले. सध्या कोरोनाचे 1469 सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3853 झाली आहे तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2361 आहे. गेल्या महिनाभरात म्हणजे 22 जूनपासून कोरोनाने एकूण 23 बळी घेतले आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तिनो पणजी येथील सरकारी निवासात सेवेत असलेल्या दोन पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात एका उपनिरीक्षकाचा समावेश आहे. पोलीस मुख्यालयातील विदेशी नोंदणी विभागातील एक पोलीस उपनिरीक्षक कोरोनाबाधित सापडला असून गोमेकॉतील एक सफाई कामगाराला कोरोनाची बाधा झाली आहे. सहकार निबंधक कार्यालय पणजी येथील एक महिला कर्मचारी कोरोनाबाधित मिळाली आहे. 23 वा बळी ठरलेल्या तरुणास मूत्रपिंड तसेच हृदयविकाराचा आजार होता, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.
एकूण 40 विदेशी प्रवाशांना तर 8 देशी प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून 34 प्रवाशांना पॉझिटिव्ह क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. संशयित रुग्ण म्हणून 34 जणांना गोमेकॉत आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहे. विविध रेसिंडेन्सी हॉटेल्समध्ये 165 जणांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. एकूण 4287 जणांची कोरोना चाचणी काल करण्यात आली. त्यापैकी 1506 जणांचे अहवाल निगेटिव्ह मिळाले तर 196 जण पॉझिटिव्ह सापडले. 2585 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
सांखळी – 72, म्हापसा – 51, पणजी – 23, कांदोळी – 30, चिंबल – 91, मडगाव – 47, पर्वरी – 26, वास्को – 315, कुठ्ठाळी – 369, धारबांदोडा – 29, फोंडा – 47 असे रुग्ण तेथील आरोग्य केंद्रात नोंद झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. विविध मार्गाने गोव्यात आलेले 147 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.
आमदार क्लाफास डायस यांची प्रकृती स्थिर
r इंदिरा नगर – चिंबल येथील युवकाच्या निधनामुळे गोव्यातील कोविड बळीची संख्या 23 वर पोचली आहे. सध्या कोविड हॉस्पिटलाच्या अतिदक्षता विभागात पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात भाजपचे आमदार क्लाफास डायस यांचा समावेश असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
रविवारी बळी गेलेल्या युवकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यात मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. रात्री 1.15च्या दरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. आतापर्यंत मोर्ले-सत्तरी, फातोर्डा, ताळगांव, कुडतरी, सांखळी, पाळोळे-काणकोण या ठिकाणी प्रत्येकी एक कोविडचा बळी गेला आहे तर मडगाव आणि चिंबलमध्ये प्रत्येकी दोन तर मुरगाव तालुक्यात एकूण 14 जणांचे बळी गेले आहेत.
पाचजणांना डिस्चार्ज
कोविड हॉस्पिटलात सध्या 130 रुग्ण उपचार घेत आहेत. काल सोमवारी एकूण पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर एकूण 23 रुग्ण नव्याने कोविड हॉस्पिटलात भरती झाले. सध्या गोव्यात कोविडबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली असून लक्षणे असणाऱया रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये दररोज किमान 15 ते 20 रुग्ण दाखल होत असतात.
तीन दिवसांचे लॉकडाऊन निष्फळ
गोव्यात नुकतेच करण्यात आलेले 3 दिवसांचे लॉकडाऊन निष्फळ ठरले असून कोरोनाबाधितांची व बळींची संख्या वाढतच असल्याचे समोर आले आहे. ‘मुरगाव तालुका लॉकडाऊन करा’ अशी मागणी होती तेव्हा ते करण्यात आले नाही आणि आता तेथे ‘लॉकडाऊन’ करणे म्हणजे केवळ फार्स असल्याची प्रतिक्रिया जनमानसातून प्रकट होत आहे.
मांगोरहिल – वास्को (मुरगाव तालुका) येथूनच कोरोनाचे संक्रमण आणि संकट वाढत गेले आणि संपूर्ण गोवाभर पसरले. ही भीती लक्षात घेऊन पूर्ण मुरगाव तालुका लॉकडाऊन करा, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. तथापि ती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावली व मांगोरहिल ‘कंटेनमेंट’ झोन केला हिच मोठी चूक झाल्याचे आता स्पष्टपणे दिसत आहे. ती चूक सुधारण्यासाठी सरकारने आता तेथे 24 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने ‘वरातीमागून घोडे’, असा अजब सरकारी कारभार दिसून आला आहे.
सलग 15 दिवसांचे लॉकडाऊन करा
संपूर्ण गोव्यात 10 ते 15 दिवस तरी लॉकडाऊन करा, अशी मागणी होत असताना सरकारने फक्त 3 दिवसातच लॉकडाऊन करून गोमंतकीय जनतेच्या तोंडाला चुना लावला आहे. मुरगाव तालुक्यावर जी वेळ आणि पाळी आता आली ती गोव्यातील इतर तालुक्यावर केव्हाही येऊ शकते, अशी परिस्थिती आहे. मुरगावात जे झाले ते पाहून नंतर सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत एक-एक तालुका लॉकडाऊन करणार की काय? असा प्रश्न आता लोकांना पडला आहे. मुरगावात जर वेळीच लॉकडाऊन केले असते तर गोव्यात कोरोनाचा एवढा फैलाव झाला नसता, त्यामुळे मुरगावातलाच प्रकार इतर तालुक्यातही घडण्याची शक्यता असून तेथेही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. म्हणून म्हणून डॉ. सावंत आणि सरकारने आता तरी जागे होऊन किमान सलग 15 दिवसांचे लॉकडाऊन करावे, अशी मागणी पुढे येत आहे.