प्रतिनिधी /पणजी
सांतईनेज येथील अग्निशामक दलाच्या मुख्यालयात 73 वा गणतंत्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी दलाचे संचालक नितीन व्ही. रायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जवानांनी मानवंदना दिली.
जगातील सर्वांत मोठी लोकशाही भारतात आहे, ही आपल्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. आपल्या संविधानात जी मुल्ये मांडलेली आहेत त्यामुळे आपण खऱया अर्थाने स्वतंत्र झालेलो आहोत. भारतीय घटना हीच खरी संपत्ती असून त्याचे जतन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्याचे तंतोतंत पालन केले पाहिजे, असे संचालक नितीन रायकर यांनी सांगितले. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी अंगी शिस्त बाळगणे आवश्यक आहे. गणवेशधारी अग्निशामक दलाने जगासमोर शिस्तीच्या बाण्याचे जिवंत उदाहरण ठेवले आहे. जनतेची संपत्ती आणि जीवित हानी वाचवण्यास जवानांनी सदैव तत्पर रहावे, असे आवाहन त्यांनी केले.