सुवर्णविधानसौधसमोर प्राध्यापकांचे आंदोलन
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यातील 430 सरकारी प्रथम दर्जा कॉलेजमध्ये सुमारे 14 हजार 564 अतिथी प्राध्यापक सेवा बजावत आहेत. या प्राध्यापकांना दैनंदिन जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा प्राध्यापकांना नोकरीत कायम करावे, अशी मागणी कर्नाटक राज्य सरकारी प्रथम दर्जा कॉलेज अतिथी प्राध्यापक संघटनेने सोमवारी विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे केली.
राज्यातील सरकारी प्रथम दर्जा कॉलेजमध्ये मागील दहा वर्षांपासून अतिथी प्राध्यापक केवळ तुटपुंज्या वेतनावर सेवा बजावत आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. कोरोनासारख्या कठीण काळात प्राध्यापकांनी कमी वेतन आणि सेवा सुरक्षा नसतानाही सेवा बजावली आहे. मात्र, प्राध्यापकांना वेतनाबरोबर इतर सुविधा मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्राध्यापकांना सेवा सुरक्षा आणि नोकरीत कायम करावे, अशी मागणी कर्नाटक राज्य सरकारी प्रथम दर्जा कॉलेज अतिथी प्राध्यापक संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.