प्रतिनिधी / बेळगाव
सरकारी शाळांमधील घटती पटसंख्या ही चिंतेची बाब आहे. मात्र, या चिंतेला सरकारी शाळांमध्ये असणाऱया भौतिक सुविधांची वाणवा व अपुरी शिक्षक संख्या हे महत्त्वाचे कारण आहे. परिणामी तात्पुरता इलाज म्हणून अतिथी शिक्षकांची नियुक्ती ही सरकारी शाळांसाठी जमेची बाजू होती. मात्र, कोरोना काळात शाळा सुरू नसल्याने रिक्त जागा आणि अतिथी शिक्षकांची नियुक्ती प्रक्रियाच जैसे थे आहे. 2019-20 या शैक्षणिक वर्षात जिल्हय़ात साधारण 800 अतिथी शिक्षक सेवा बजावत होते. मात्र, 2020-21 या शैक्षणिक वर्षात अतिथी शिक्षक म्हणून कार्य करणाऱया शिक्षकांना शिक्षकी सेवेविनाच राहावे लागले आहे.
शिक्षकांच्या रिक्त जागा आणि एक अथवा दोन शिक्षकांवरच येणारा कामकाजाचा ताण यामुळे सरकारी शाळांमधील निवृत्त शिक्षक तसेच रिक्त जागांची यादी तयार करून सदर जागांवर अतिथी शिक्षकांची नियुक्ती केली जात होती. सदर नियुक्ती प्रक्रिया रिक्त जागांवर शिक्षक भरती होईपर्यंत संबंधित शैक्षणिक वर्षापूरती मर्यादित होती. यामुळे सरकारी शाळांच्या शैक्षणिक विकासात अतिथी शिक्षक नियुक्तीचा आधार मिळत होता. मात्र, यंदाच्या शैक्षणिक प्रक्रियेबाबतच्या स्थितीमुळे सरकारी शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची संख्या कमी आहे.
कोविड-19 आणि लॉकडाऊन यामुळे शैक्षणिक वाटचालीवर परिणाम झाला असून शैक्षणिक प्रक्रिया रखडली आहे. प्रत्यक्ष शाळा सुरूच नसल्याने त्या अनुषंगाने येणाऱया समस्या आणि समस्यांचे निराकरण करण्याच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष झाले आहे. गतवर्षी मराठी सरकारी शाळांमध्ये मराठी शिक्षकच अतिथी असे चित्र देखील अनुभवायला मिळाले होते. मात्र, सदर रिक्त जागांवर विद्यार्थ्यांच्या पटसंख्येअभावी शिक्षक नियुक्तीचा मार्गदेखील मोकळा झाला नाही. परिणामी गतवर्षी अतिथी शिक्षक म्हणून सेवेत असणारे शिक्षक सेवेविनाच असल्याचे दिसून येत आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची प्रतीक्षा कोरोना कार्यकाळात प्रत्यक्ष शिकवणी नसल्याने एक-दोन शिक्षकांवरच शाळांची वाटचाल सुरू आहे. गतवर्षी अतिथी शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अतिथी शिक्षकांना पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. यामुळे शिक्षक म्हणून नोकरीत असणारे अतिथी शिक्षक पुन्हा रुजू होण्यासाठी निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.