गावात केवळ जीओ कंपनीचाच टॉवर असल्याने रेंजची समस्या : टॉवर उभारण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
अतिवाड गावात केवळ जीओ कंपनीचाच टॉवर आहे. मात्र, त्यालाही रेंज सुरळीत नसल्याने गावातील मोबाईलधारक हैराण झाले आहेत. ग्रामस्थांना रेंज मिळविण्यासाठी गावच्या बाहेर जावे लागत आहे. रेंजअभावी मोबाईल कुचकामी ठरले असून, अतिवाडमध्ये रेंज नसल्याने मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. परिसरात जीओ वगळता कोणत्याच कार्डला रेंज मिळत नसल्याने मोबाईलधारकांतून संताप व्यक्त होत आहे.
गावात रेंजअभावी फोन लागत नाही, तर कधी आवाज येत नाही, अन् चुकून आवाज आलाच तर मध्येच आवाज गायब होतो. असे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात अडचणी येत आहेत. मोबाईलला सुरळीत रेंज नसल्यामुळे मोबाईलधारक वैतागले असून रेंज मिळविण्यासाठी कधी स्लॅबवर तर कधी बाहेर धडपड करावी लागते. गावात कोणत्याच कंपनीचा रेंज नसल्याने मोबाईलवर नॉट रिचेबलचा सिग्नल येत आहे. संबंधित कंपनीने गावात टॉवरची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरून आहे.
हंदिगनूर गावात उभारलेल्या टॉवरवरून काही वेळा एअरटेल रेंज येतो मात्र, ती ही सुरळीत नसल्यामुळे मोबाईलधारकांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. गावातील वीजपुरवठा खंडित झाला तर टॉवर बंद पडतो. त्यानंतर मोबाईलवर रेंज गायब होते. मोबाईलवरील संवादही मध्येच बंद होतो. या दैनंदिन प्रकाराला मोबाईलधारक वैतागले असून गावात तातडीने टॉवर उभा करावा. अन्यथा, आंदोलन छेडणाच्या इशारा मोबाईलधारकांनी दिला आहे. मोबाईल कंपन्यांच्या रिचार्जचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे मोबाईलधारकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. तरीपण रेंज नसल्याने रिचार्ज केलेले पैसे वाया जात आहेत.
विद्यार्थ्यांचीही गैरसोय
कोरोनामुळे पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धत अवलंबिण्यात येत आहे. मात्र, मोबाईलला रेंज नसल्यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी महागडे स्मार्ट फोन खरेदी केले आहेत. मात्र, रेंजअभावी ते कुचकामी ठरले आहेत.
तातडीने टॉवरची उभारणी करा-सागर पाटील, अतिवाड
गावात एअरटेल व जीओ कंपनीची सीमकार्डे सर्वांकडे आहेत. मात्र, गावात केवळ जीओ कंपनीचा टॉवर आहे. मात्र, त्यालाही सुरळीत रेंज मिळत नाही. त्यामुळे फोनवर बोलण्यासाठी गाव सोडून बाहेर दोन किलोमीटर जावे लागत आहे. रेंजअभावी मोबाईल निरुपयोगी ठरत असून तातडीने टॉवरची उभारणी करावी, अडचणीच्या वेळेला डॉक्टर किंवा अन्य कोणाला फोनवरून संपर्क साधायचा असल्यास रेंजअभावी अडचणी निर्माण होत आहे.