प्रतिनिधी /सांगली
महापूर आणि कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अशा परिस्थितीत सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचा सन 2021-2022 चा 710 कोटी जमा अन् 43 कोटी शिलकेचा अर्थसंकल्प आयुक्त नितीन कापडणीस यांनी बुधवारी स्थायी समिती सभापतींच्याकडे सादर केला. दरम्यान अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही. प्रदूषणमुक्त शहरांसाठी 25 कोटी, नाला बांधकामांसाठी 10 तर विजयनगर येथील महापालिकेच्या इमारत बांधकामांसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त कापडणीस यांनी दिली.
दरम्यान शासनाकडून मिळणाऱया एलबीटीच्या अनुदानामुळे महापालिकेला तारले. अधिकारी, कर्मचाऱयांचे पगार, वीजबिल, सादील खर्च भागविताना अडचणी आल्या नाहीत. सातवा वेतन आयोग लागू करुनही महापालिकेच्या तिजोरीवर ताण पडला नाही. अमृत, ड्रेनेजसह शासकीय योजना राबविताना कोणतीही अडचण आली नाही, असेही आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केले. मार्चएंडही चांगला जाईल. उपयोग कर्ता शुल्कातून महापालिकेला 4 कोटी 25 लाख रुपयांचे तर रिलायन्स् तसेच गॅससाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या नुकसान भरपाईमधून 8 ते 10 कोटींचे उत्पन्न मिळाल्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान यंदा चांगले महसुली उत्पन्न मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
करवाढ नसलेला अर्थसंकल्प
दरम्यान सन 2021-22 या वर्षासाठी 710 कोटी 47 लाख रुपये महसुली जमेचे व 43 लाख रुपये खर्चाचा अर्थसंकल्प प्रशासनाने तयार केला आहे. गतवर्षीच्या अर्थसंकल्पात फारसा बदल केलेला नाही. कोणतीही करवाढ केलेली नाही. कोरोनाच्या प्रादर्भावामुळे करवसुली झालेली नाही. त्यात थकीत घरपट्टी वसुलीसाठी दंड व शास्ती माफ करण्यात आली आहे. विविध परवाना फीमध्ये वाढ केलेली आहे. त्यामुळे यंदा थकबाकी वसुलीवर भर राहणार आहे. यामुळे मार्चअखेरपर्यंत 272.98 कोटीचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. तर पुढीलवर्षी महसुली उत्पन्न 315 कोटी 05 लाख अपेक्षित आहे. 15 व्या वित्त आयोगातूनही 30 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल.
मनपा इमारतींसाठी 10 कोटींची तरतूद
आयुक्त म्हणाले, शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी तब्बल 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक नाला बांधकामांसाठी 10 कोटी, घनकचरा व्यवस्थापन, कचरा डेपोसाठी 2 कोटी, काळीखण विकासासाठी 1 कोटी, गणेश तलाव सुशोभिकरण, कारंजासाठी 1 कोटी, ड्रेनेजर चर दुरुस्तीसाठी 1 कोटी, पॅचवर्कसाठी 2 कोटी, स्मारकांच्या दुरुस्तीसाठी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय विजयनगर येथील महापालिकेच्या इमारतीसाठी 15 कोटी तर कुपवाड व मिरज एमआयडीसीमधील रस्ते तसेच विविध कामांसाठी 1 कोटींची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. तिन्ही शहरांच्या विकासांवर भर देण्यात येणार आहे. कुपवाडमध्ये उद्यानासाठी तरतूद करण्यात आली आहे.
31 मार्चपूर्वी महासभेत सादर करु
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी 710 कोटी जमेचे व 43 लाख रुपयांच्या शिलकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर केला आहे. समिती याचा अभ्यास करेल. सदस्यांच्या सूचना घेवून त्यामध्ये वाढ करु. येत्या 31 मार्च पूर्वी अंतीम अर्थसंकल्प महासभेत सादर करु.
पांडुरंग कोरे, सभापती, स्थायी समिती.
अर्थसंकल्पातील वैशिष्ट्य
वैशिष्ट्य तरतूद
महापालिकेचे नवे मुख्यालय 10 कोटी
चारही प्रभाग समितीसाठी प्रत्येकी 1 कोटी
शामरावनगर पाणी निचरा आराखडा 1 लाख
आरक्षित जागेवरील भूसंपादन 16 कोटी
विस्तारित भागात भाजीमंडई 28 लाख
शहरात नवीन नाटÎगृह 25 लाख
अतिथीगृह पाडून नवीन व्यापारी संकुल 2 कोटी
2018 ते 20 मधील ठेकेदारांच्या बिले 20 कोटी