प्रतिनिधी / नागठाणे :
अतीत (ता.सातारा) येथे महामार्गालगत असलेल्या बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी 5 लाख रुपये किंमतीचे साडेबारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. मंगळवारी भर दुपारी ही घरफोडी झाल्याने अतीत गावसह परिसरात एकच खळबळ उडाली. या घरफोडीची फिर्याद संजय मारुती यादव (वय.33, रा.अतीत, ता.सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संजय यादव यांचे अतीत येथे महामार्गानजीकच कमानीजवळ घर आहे. घरी ते त्यांचे आई-वडील,व लहान भाऊ रहावयास असून संजय यादव व त्यांच्या भावाची पत्नी या दोघी बाळंतपणासाठी त्यांच्या माहेरी गेल्या आहेत. तर भाऊ नोकरीनिमित्त पुण्याला राहत आहे. मंगळवारी दुपारी संजय यादव हे चुलत बहिणीस घेऊन पत्नीला भेटण्यासाठी मांडवे (ता.सातारा) येथे गेले होते. तर त्यांचे आई-वडील हे दरवाजाला कुलूप लावून रानात गेले होते. पत्नीला भेटून संजय यादव हे दुपारी 2 च्या सुमारास अतीत येथे घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून ते दरवाज्याला अडकवलेल्या स्थितीत आढळले. यावेळी त्यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना घरातील दोन कपाटे उघडी असल्याचे व त्यातील सर्व साहित्य अस्तव्यस्त पसरल्याचे निदर्शनास आले. तसेच सोन्याचे दागिने ठेवलेला डबाही बाहेर असल्याचे दिसले.
यावेळी त्यांना डब्यातून साडेबारा तोळे वजनाचे सुमारे 5 लाख रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ बोरगाव पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी ठसेतज्ञ व श्वानपथकास पाचारण करण्यात आले.रात्री उशिरा या घरफोडीची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर करत आहेत.