प्रतिनिधी / महाबळेश्वर :
मनोहर गृहनिर्माण सोसायटीमधील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच असेच एक नऊ वर्षांपुर्वी घडलेल्या अत्याचाराचे प्रकरण महाबळेश्वर पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. या नव्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या तक्रारीच्या आधारे महाबळेश्वर पोलिसांनी दोन महीलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
महाबळेश्वर पोलीस ठाण्यात एका महीलेने तक्रार दिली आहे की, 2012 मध्ये मी अल्पवयीन असताना गोरंग कालीपोदो पाल (रा सुमन कॉटेज बंगला, वेण्णालेक जवळ महाबळेश्वर) याने माझे बरोबर संमती शिवाय शारीरिक संबंध ठेवले. यासाठी मला वेळोवेळी धमकी देवुन मारहाण करण्यात आली. या अत्याचारातुन मी गरोदर राहीले असता मला पुण्यातील एका रूग्णालयात नेवुन माझा गर्भपात करण्यात आला. माझेवर अत्याचार करणारास येथील आरती गोरंग पाल व इंदुबाई सुरेश सपकाळ यांनी वेळोवेळी मदत केली.
या महीलेच्या तक्रारी वरून महाबळेश्वर पोलिसांनी गोरंग पाल, आरती पाल व इंदुबाई सपकाळ या तीघांविरोधात बालकांचे लैगिंक अत्याचारा पासुन संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 4,8,12,17 तसेच भादवी कलम 376, 376 तीन, 354 अ , 504 ,506 ,34 या कलमा नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ए एम बिद्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर पोलिस करीत आहेत.