वार्ताहर/ अथणी
जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शनिवारी एकाच दिवशी 213 रुग्णांची भर पडताना हजारचा आकडा पार केला होता. अथणी तालुक्यातही 23 कोरोनाबाधितांची भर पडली होती. रविवारी तर अथणी तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून 100 हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापैकी अथणी शहरात 85 कोरोनाबाधित आढळले आहेत. कागवाड 19, निपाणी 12, चिकोडी 3, रायबाग 6, गोकाक 2 असे रुग्ण चिकोडी विभागात आढळले आहेत.
अथणी तालुक्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य खात्यासह स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. रविवारी अथणी शहरात 85 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याबरोबरच कटगेरी 1, यंकची 5, देवरहट्टी 1, दरुर 1, चिकट्टी 1, संकोनहट्टी 3, बाळीगेरी 1, चमकेरी 1 असे कोरोनाबाधित रुग्ण तालुक्यातील ग्रामीण भागातही आढळले आहेत. यापैकी अनेकजण महाराष्ट्र रिटर्न आहेत. असे असले तरी बरेच जणांना कोणतीही टॅव्हलहिस्ट्री नसल्याने सामूहिक संसर्गाचा धोका वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तर कागवाड तालुक्यातील कागवाड, उगारखुर्द आणि शिरगुप्पी या तीन ठिकाणी 19 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
निपाणीत महिलेस बाधा
निपाणी : निपाणी शहरातील आश्रयनगर भागात एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर महिला 24 वर्षीय आहे. तिच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात येत आहे. दरम्यान शनिवारी निपाणी शहरासह तालुक्यात 12 पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र रविवारी एका महिलेला लागण झाल्याने अन्य तालुक्यांच्या तुलनेत निपाणी तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याबरोबरच हुक्केरी तालुक्यात 6 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी 4 हुक्केरी व दोघे संकेश्वर शहरातील आहेत. हुक्केरी शहरातील 4 पैकी 3 नगर परिषदेचे कर्मचारी व एक अग्निशमन दलाचा जवान असल्याने पुन्हा एकदा शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गोकाक तालुक्यात दोघे बाधित
घटप्रभा : रविवारी गोकाक तालुक्यातील कोण्णूर येथे दोघेजण तसेच मुडलगी तालुक्यातील सिध्दापूरवाडी येथे एक कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. जगदीश जिंगी यांनी दिली. कोण्णूर येथे 15 दिवसांपूर्वी मधुमेह व कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्या वृध्देच्या दोन्ही मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना गोकाक येथील कोव्हीड केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तर हिंडलगा कारागृहात असलेल्या सिध्दापूरवाडी येथील महिलेस कोरोनाची लागण झाल्याने तिला बेळगाव येथील सरकारी इस्पितळात हालविण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगण्यात आले.
रायबाग तालुक्यात सहा रुग्णांची भर
रायबाग : रविवारी आरोग्य खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रायबाग तालुक्यामध्ये 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी कुडची येथे 3, संकनवाडी येथे 2 तर परमानंदवाडी येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा समावेश आहे. यांचे पॉझिटिव्ह अहवाल येताच आरोग्य खात्याने सहाही जणांना त्वरीत येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी हलविले. शिवाय बाधितांच्या परिसरात औषध फवारणी करीत तो परिसर सीलडाऊन केला.
चिकोडी तालुक्यामध्ये तिघे बाधित
चिकोडी : रविवारी आरोग्य खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार चिकोडी तालुक्यातील तिघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये शहरातील एक पुरुष तर अंकली व मांजरीवाडी येथील प्रत्येकी एक महिलेचा समावेश आहे. चिकोडीतील एका 45 वर्षीय व्यक्तीस तर अंकली येथील 32 वर्षीय व मांजरीवाडी येथील 33 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आल्या. त्यांना प्रशासनाने उपचारासाठी संपर्क साधला असून, या बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्याचे व परिसर सीलडाऊन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.