हिंडेनबर्गच्या कथित गौप्यस्फोटाचा परिणाम शून्य
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अमेरिकेच्या हिंडेनबर्ग या संशोधन संस्थेने केलेल्या गंभीर आरोपांनंतरही अदानी उद्योगसमूहाच्या एफपीओला गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. यामुळे अखेर अदानी यांनी बाजी मारली असे दिसून येत आहे. त्यांच्या उद्योगसमूहावर हिंडेनबर्गने आर्थिक गैरव्याहार करुन प्रचंड संपत्ती जमा गेल्याचा आरोप केला होता. संस्थेने तसा अहवालही प्रसिद्ध केला होता. मात्र, गुंतवणूकदारांनी या अहवालाकडे पाठ फिरवत अदानी यांच्यावरच विश्वास प्रदर्शित केला आहे.
मंगळवार हा या एफपीओचा (फॉलोअप ऑफर) शेवटचा दिवस होता. त्या दिवशी हा एफपीओ पूर्णतः सबस्क्राईब झाल्याचे घोषित करण्यात आले. गेले काही दिवस हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी यांचा उद्योगसमूह अतिशय दबावाखाली होता. शेअरबाजारांमध्ये त्याच्या समभागांची मोठी घसरण झाली होती. त्यामुळे उद्योगसमूहाचे भांडवली मूल्य 65 अब्ज डॉलर्स किंवा जवळपास 5 लाख 24 हजार कोटी रुपयांनी कमी झाले होते. त्यामुळे या उद्योगसमूहाला कर्ज देणाऱया एलआयसीसारख्या वित्तसंस्थांची चिंताही वाढली होती. मात्र, एफपीओला मोठा प्रतिसाद मिळाल्याने उद्योगसमूह आणि त्याच्या कर्जदारांनाही दिलासा मिळाला आहे.
अनेक पट अधिक प्रतिसाद
या एफपीओमध्ये अनेक श्रेणींमध्ये समभागांची विक्री करण्यात आली आहे. त्यापैकी गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठीच्या 10 लाखांवरील श्रेणीचा एफपीओ 5.13 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. एनआयआय श्रेणीतील 2 लाख ते 10 लाखाचा एफपीओपैकी 3.13 कोटी समभागांची विक्री झाली. यातील बहुतांश समभाग अंबानी, सज्जन जिंदाल, सुनिल मित्तल, सुधीर मेहता आणि पंकज पटेल यांच्या उद्योगांनी घेतले आहेत. इतर श्रेणींमधील समभागांनही अनेक पट अधिक बोली लावली गेली आहे. त्यामुळे या एफपीओ यशस्वी झाल्याचे दिसून येते.
20,000 कोटी रुपयांचा एफपीओ
अदानी समूहाचा हा एफपीओ 200 अब्ज रुपये किंवा 20 हजार कोटी रुपयांचा होता. त्याचा प्रारंभ होण्यापूर्वीच काही काळ हिंडेनबर्गने आपला खळबळजनक अहवाल प्रसिद्ध करुन या एफपीओसमोर अडचणी निर्माण केल्या होत्या. अदानी समूहाच्या समभागांची पडझड झाल्याने या एफपीओचे काय होणार हीच चर्चा सर्वत्र होती. काही तज्ञांच्या मते अदानींना गुंतवणूकदारांचा पुरेसा प्रतिसाद मिळविण्यात अपयश येऊ शकणार होते. तथापि, या तज्ञांचा अंदाज खोटा ठरला असून एफपीओ पूर्णतः सबस्क्राईब झाल्याने समाधानाची भावना आहे.
समभाग वधारले
मंगळवारी अदानी समूहाच्या समभागांचे दर काही प्रमाणात पुन्हा वाढल्याचे पहावयास मिळाले. तरीही गेल्या चार दिवसांमध्ये झालेली हानी भरुन निघण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. मात्र एफपीओला मिळालेल्या यशामुळे गुंतवणूकदारांना आर्थिक तसेच भावनात्मकही दिलासा मिळाला आहे.