अभिनेत्री अदिती पोहनकर आणि अभिनेता भूषण पाटील यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘पाहिले मी तुला’ चित्रपटाचे पोस्टर निर्मात्यांनी प्रदर्शित केले आहे. हा चित्रपट 4 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. कौटुंबिक नाटय़ असलेल्या या चित्रपटात आयुष आणि अलिशा या भूमिकेतील भूषण अन् अदिती यांनी रंगविलेली प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे.
स्वतःच्या दैनंदिन जीवनात व्यग्र असलेल्या लोकांना प्रेमाच्या माध्यमातून उत्साहपूर्ण करणारा हा चित्रपट असल्याचे दिग्दर्शक मनोज कोटियान यांनी म्हटले आहे. या चित्रपटात भूषण पाटील, अदिती पोहनकर, उदय टिकेकर, अतुल तोडणकर, सुहास परांजपे, माधव अभ्यंकर, शुभांगी लाटकर आणि अमृता पवार यांच्या मुख्य भूमिका आहेत.
या चित्रपटाबद्दल मी खूपच उत्सुक आहे. नाटय़मय वळणाची ही खूप गोड आणि भावगर्भ प्रेमकथा असल्याचे उद्गार अदितीने काढले आहेत. चित्रपटाची कथा सारंग पवार आणि सुशील पाटील यांची आहे. पटकथा आणि संवादलेखन अभय अरुण इनामदार यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सुशील पाटील, नीलेश लोणकर, अरविंद राजपूत यांनी एनएसके श्री फिल्म्स इंटरनॅशनलच्या बॅनर अंतर्गत केली आहे.