प्रतिनिधी /मडगांव
अधिकाराशिवाय राष्ट्रध्वज फडकवल्याबद्दल चिंचणी येथील रहिवासी माल्कम परेरा याला कुंकळळी पोलिसांनी काल रविवारी ताब्यात घेतले. चिंचणी ग्रामपंचायत ध्वजारोहणाच्या तयारीत असताना ही घटना घडली. उलपब्ध माहिती प्रमाणे ग्रामपंचायतीने ध्वजारोहण करण्यासाठी राष्ट्रध्वज व्यवस्थित बांधून ठेवला होता. तो माल्कम यांनी कोणत्याच अधिकाराशिवाय फडकावला.
गोवा मुक्तीदिन साजरा करण्यासाठी चिंचणी ग्रामपंचायतीने गेले काही दिवस तयार केली होती व काल सकाळी राष्ट्रध्वज व्यवस्थित बांधून ठेवला होता. स्थानिक सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार होते. त्यासाठी सकाळीच काही नागरिक व काही पंच सदस्य गोळा झाले होते. पोलीस ही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
अचानक माल्कम परेरा हा सकाळीच ध्वजस्तंभाजवळ आला व त्याने पायातील बुट काढून बाजूला ठेवले व ध्वजस्तंभाजवळ जाऊन बांधून ठेवलेल्या तिरंग्याचे ध्वजारोहण केले. यावेळी उपस्थित पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व पोलीस वाहनात बसवून पोलीस स्थानक गाठले. माल्कमने ध्वजारोहण करताना ध्वजपूर्णपणे ध्वज वर खेचला नाही. ध्वज अर्धावर राहिल्याने उपस्थित पंच सदस्य तसेच पोलीस गोंधळून गेले. ध्वज वर खेचण्यासाठी जे चाक (गाडी) बसविले होते. त्यातून ध्वजाची दोरी निसटून बाहेर आल्याने ध्वज अर्धावर राहिला. हा ध्वज पुन्हा दुरूस्त करण्यात आला व नंतर सरंपचांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सर्वात अगोदर ध्वजारोहण करण्यासाठी गेलेल्या माल्कम परेरा याला मात्र पोलीसांनी ताब्यात घेतले. कारण कोणत्याही अधिकाराशिवाय त्याने ध्वजारोहण केले होते. माल्कमच्या कृतीचा उपस्थित पंच सदस्यांनी तीव्र निषेध केला व पंच सदस्य पदाचा राजीनामा देण्याची भाषा सुरू केली होती.