बाबुराव धुरी यांचा आरोप : दोषींवर कारवाई करण्याचा ठराव : दोडामार्ग पं.स.बैठक
वार्ताहर / दोडामार्ग:
बुधवारी दोडामार्गातील रस्त्यांच्या झालेल्या दयनीय स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केल्यानंतर गुरुवारी दोडामार्ग पंचायत समितीची मासिक सभाही याच विषयावर केंद्रीत झाली. राज्यशासनाच्या अंतर्गत दोडामार्ग तालुक्यात जेवढे रस्ते आहेत, त्यापैकी बऱयाच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. संबंधित कामासाठी वर्कऑर्डरही निघाल्या आहेत. मात्र, अधिकारी व ठेकेदारांच्या अकार्यक्षमतेमुळे रस्त्यांची कामे प्रलंबित राहिली आहेत, असा आरोप सदस्य बाबुराव धुरी यांनी केला. अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई झालीच पाहिजे, असा ठराव मंजूर करण्यात आला.
दोडामार्ग पं. स. ची मासिक सभा गुरुवारी सभापती संजना कोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला सदस्य लक्ष्मण नाईक, सुनंदा धर्णे, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी नाईक यांनी मांगेली सरपंच अविश्वास ठरवावेळी तेथील एका ग्रा. पं. सदस्याच्या उपस्थितीवरुन आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. नाईक यांनी सांगितले की, मांगेली सरपंचावरील अविश्वास ठरवावेळी जो एक ग्रा. पं. सदस्य उपस्थित राहिला, त्याच्या घरात अन्य कोरोना पॉझिटिव्ह होते. मग त्याला ठरवावेळी कसे उपस्थित राहू दिले गेले. असे नाईक यांना विचारताच आरोग्य विभागाच्या नजरचुकीमुळे तसे घडले होते. मात्र, सदर सदस्य हा त्याठिकाणी राहत नव्हता, असे धुरी यांनी सांगितले. यावरून नाईक व धुरी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
तालुक्यातील काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी आपल्या पदाचा तसेच सत्तेचा गैरवापर करत आहेत. आपण स्वत: पत्रे लिहून त्याखाली संबंधित अधिकाऱयांची सही घेतात, असा गौप्यस्फोठ नाईक त्यांनी केला. साटेली-भेडशी येथील श्री सातेरी जिल्हा परिषद केंद्र शाळेची राज्य शासनाने मॉडेल स्कूल म्हणून निवड केली आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तालुक्यातील ज्या शाळांची दुरुस्तीची कामे करायची आहेत, त्या कामांनाही तात्काळ सुरुवात करण्यात यावी, असेही धुरी यांनी संगितले.