वार्ताहर/ रामनगर
गोवा हद्दीतून अनमोडमार्गे कर्नाटकात गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना सोमवारी अनमोड अबकारी अधिकाऱयांनी पकडली. लॉकडाऊन काळात दारू विकणे पूर्णतः बंद असूनही गोवा येथे भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारे पासधारक दारूसाठा आणत आहेत. सोमवारी सायंकाळी बेळगाव येथील केए 22 बी 5378 या ट्रकची अनमोड नाक्यावर तपासणी केली असता 40.500 गोवा बनावटीची दारू आढळून आली. यात रॉयल स्टॅगच्या बाटल्या आढळल्या. ट्रकसह 7 लाख 19 हजार 920 रुपयाची दारू जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी इस्माईल अविरसाब (वय 27, रा. जगेटहाळी, ता. हुक्केरी) याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. सदर कारवाई अनमोड अबकारी उपनिरीक्षिका रेश्मा बानावळीकर, कर्मचारी सदाशिव राठो, दीपक बारामती, टी. बी. गौडा, उळव्याप्पा तुळजा आदींनी केली. गोवा हद्दीतून मालवाहतूक रेल्वेनेही मोठय़ा प्रमाणावर दारूसाठा येत आहे. सदर दारूसाठा कॅसलरॉक व अळणावर या ठिकाणी उतरविण्यात येत असून त्यावरही कारवाईची मागणी होत आहे.