महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात-अनिरुद्ध महापराक्रमी होता. बाणासुराचे ते सैनिक त्याला पकडण्यासाठी जसजसे त्याच्या अंगावर धावून जात, तसतसा तो त्यांना, डुकरांच्या कळपाच्या नायकाने कुत्र्यांना मारावे, त्याप्रमाणे मारू लागला. अनिरुद्धाच्या फटकाऱयाने त्या सैनिकांची मस्तके, हात, मांडय़ा इत्यादी अवयव तुटू लागले, तेव्हा ते महालाबाहेर पळून गेले.
दैत्यसेना कोटय़नुकोटि । अनिरुद्ध वेष्टुनि उठाउठीं ।
करिती शस्त्रास्त्रांची वृष्टि । विलोकी दृष्टी बळितनया ।
तंव तो प्रतापी उषारमण । दावी बाणातें आंगवण ।
परिघघातें झोडिलें सैन्य । पळती भणाण महादैत्य ।
परिघें ठोकितां कुञ्जरदळें । घायें फुटती कुंभस्थळें ।
उसळोनि पडती मुक्ताफळें । जलदोपलांसम समरिं ।
रथी मारिले परिघघातीं । अधोमुखें रुधिरें वमती ।
कित्येक मूर्छित पडिले क्षिती । एक दिगंतीं पळाले ।
पायींचे लपती सांदीकोंदीं । वातवेगें अश्वसादी ।
बाणासुर विवरी बुद्धि । म्हणे हा युद्धीं नाटोपे ।
मग स्मरूनि आसुरी माया । वारुणीविद्या जपूनियां ।
नागपाशीं प्रद्युम्नतनया । बांधूनियां पाडिलें ।
जैसा प्रचंड महावात । अंगीं झगटे अनावरत ।
नागपाशीं अकस्मात । तेंवि मूर्छित पाडिला ।
कंठ कर पद बांधिले पाशीं ।
स्मृति हारपली मानसीं ।
मूर्छित पडला रणभूमीसी ।
बाण तयासी वधूं पाहे ।
तंव तो पातला कुंभाण्ड मंत्री ।
अनिरुद्धातें लक्षूनि नेत्रीं ।
म्हणे हा प्रतापी वीर क्षत्री ।
मूर्छित निःशस्त्रे या न वधीं ।
बलि÷ ठेवूनियां राखण । याचें करिं संरक्षण ।
कुल शील जाती कोण । शोधूं आपण साकल्यें ।
येणें भोगिली तव नंदिनी । आन तयेच्या पाणिग्रहणीं।
सहसा प्रवर्तों न शके कोणी ।
रहस्य जाणोनि या रक्षीं ।
जरी तूं मारिसील यालागून । दु:खें उषा देईल प्राण ।
उषेची जननी आक्रन्दून । पावेल मरण तत्काळ ।
तुझी ऐकूनि हे राहटी । क्षोभेल गौरीसह धूर्जटि ।
यालागीं विवेक विवरूनि पोटीं । वीर जगजेठी रक्षावा ।
ऐसें ऐकूनि प्रधानवचन । विवेकारूढ झाला बाण ।
ठेवूनि प्रतापी वीर रक्षण । गेला आपण निजसदना ।
तंव उषा हृत्कमळीं घाबरी । करितां कान्ताची अवसरी।
वार्ता घेऊनियां किंकरी । आल्या सहचरी ते काळीं ।
म्हणती अवो बाणात्मजे । तुझ्या कान्तें प्रतापें तेजें ।
प्रचंड दैत्य मारिले पैजे । कोणी न झुंजे येणेंसी ।
धुरा पाडिल्या समराङ्गणीं। केली गजदळा भंगाणी ।
रथी झोडिले परिघेंकरूनी । गेले पळोनि महावीर ।
हा एकला ते बहुत । मारिती नि÷gर शस्त्रघात ।
अनिरुद्धवीर प्रतापवंत । प्रलयकृतान्त तुलनेचा ।
प्रचंड मारिली दैत्यसेना ।
परम संकट पडिलें बाणा ।
तेणें वारूनि कृतसाधना ।
आणिला रणा अनिरुद्ध ।
बाणें नागपाशें बांधूनी ।
अनिरुद्ध पाडिला समराङ्गणीं ।
भोंवतीं रक्षणें ठेवूनी । आपण सदनीं प्रवेशला ।
Ad. देवदत्त परुळेकर