वृत्तसंस्था/ सिडनी
कसोटी मालिकेपूर्वीचा तीन दिवसांचा पहिला सरावाचा सामना मंगळवारी अनिर्णित अवस्थेत संपला. या सामन्यात भारत अ संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने दुसऱया डावात अर्धशतक झळकविले. ऑस्ट्रेलिया अ संघातील वेगवान गोलंदाज स्टेकेटीने 37 धावांत 5 गडी बाद केले.
या सामन्यात भारत अ संघाने आपला पहिला डाव 9 बाद 247 धावांवर घोषित केला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिला डाव 9 बाद 306 धावावर घोषित केला. 59 धावांनी पिछाडीवर असलेल्या भारत अ संघाने मंगळवारी आपल्या दुसऱया डावाला सुरूवात केली आणि 9 बाद 189 धावा जमवित ऑस्ट्रेलिया अ संघाला विजयासाठी 15 षटकांत 130 धावांचे आव्हान दिले. भारत अ संघाचा दुसऱया डावामध्ये यष्टीरक्षक साहाने 7 चौकारांसह 100 चेंडूत 54 धावा जमविल्या. साहाला पहिल्या डावात खाते उघडता आले नव्हते. शेवटच्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलिया अ ने 1 बाद 52 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना अखेर अनिर्णित राहिला. या सामन्यात रहाणेने पहिल्या डावात शतक झळकविले तर दुसऱया डावात 28 धावा जमविल्या. भारत अ च्या दुसऱया डावात गिल आणि शॉ यांनी पहिल्या गडय़ासाठी 37 धावांची भागिदारी केली. शॉने 19 तर गिलने 29 धावा जमविल्या. हनुमा विहारीने 28 धावांचे योगदान दिले. भारत अ च्या दुसऱया डावात मार्क स्टेकेटीने भेदक गोलंदाजी करत 37 धावांत 5 गडी बाद केले. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली दिवस-रात्रीची कसोटी ऍडलेड येथे 17 ते 21 डिसेंबर दरम्यान खेळविली जाईल.
संक्षिप्त धावफलक : भारत अ डाव- 9 बाद 247 डाव घोषित, ऑस्ट्रेलिया अ प.डाव-9 बाद 306 डाव घोषित, भारत अ दु. डाव- 9 बाद 189 डाव घोषित, ऑस्ट्रेलिया अ दु. डाव 1 बाद 52.