मुंबई/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने समन्स पाठवलं आहे. यात त्यांना मंगळवारी चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान अनिल देशमुख यांना ईडीने तिसरं समन्स बजावलं आहे. याआधी ईडीने देशमुखांना दोन समन्स बजावले आहेत. देशमुख यांना येत्या ५ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
ईडीच्या तपासात सचिन वाझे याच्याकडून आलेला पैसादेशमुखांचे स्वीय सहाय्य्क संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याकडे जायचा. त्यानंतर तो वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत ऋषिकेश देशमुख यांच्या कंपन्या आणि ट्रस्टमध्ये वळविण्यात आला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात ऋषिकेश देशमुख याचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना समन्स बजावण्यात आले आहे, अशी माहिती इडीने दिली आहे.
ईडीने शनिवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांसह पाच ठिकाणी छापा टाकला होता. दोघांना समन्स पाठवण्यात आल्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.