ऑनलाईन टीम / मुंबई :
सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला आहे. त्यामुळे दिव्यांग शाळेतील 4899 शिक्षक व 6159 अन्य कर्मचारी अशा एकूण 11 हजार 58 कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.
दिव्यांग कल्याण आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमधील 11 हजार 58 शिक्षक-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती. त्यावर मुंडे यांनी एक अभ्यासगट नेमून सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्याची आज पूर्तता झाली असून, शासन आदेश निगर्मित करण्यात आला आहे.