माणसांनी आपले एअरपॉडस् कोठेतरी विसरणे किंवा ते पळताना खिशातून पडणे, अशी घटना मुळीच नवी नाही आहे. तथापि, अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स् येथील एका व्यक्तीने चक्क झोपेत आपले एअरपॉडस् गिळून टाकल्याची विस्मयकारक घटना नोंद झाली असून साऱया जगात कुतुहलाचा विषय बनली.
ब्रॅडफोर्ड गुथर असे या महाभागाचे नाव असून तो काही दिवसांपूर्वी रात्री एअरपॉडस् सुरू ठेवूनच झोपला. सकाळी त्याला जाग आली तेव्हा एक एअरपॉड हरविलेला असल्याचे त्याला आढळले. तसेच त्याला छातीच्या मध्यभागी दुखत असल्याचे वाटू लागले. तो रूग्णालयात गेला आणि तेथे क्ष किरण तपासणीत हा एअरपॉड त्याच्या अन्ननलिकेत अडकल्याचे लक्षात आहे. डॉक्टरांनी एंडोस्कोपीची शस्त्रक्रिया करून तो घशातून बाहेर काढला. तो त्याने त्याच्याही नकळत झोपेतच गिळला होता. या घटनेसंबंधी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एअरपॉड न कळत गिळणे आणि तो अन्ननलीकेत अडकूनही विशेष न दुखणे, असा प्रकार दुर्मिळातला दुर्मिळ आहे, असे त्याच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. जेव्हा त्याने त्याच्या घरातल्या लोकांना एअरपॉड अचानक हरविल्याची घटना सांगितली तेव्हा त्यांनी चेष्टेत ‘़तू तो गिळला असशील’ असे उद्गार काढले होते. पण ते अशा प्रकारे खरे ठरतील अशी त्याची किंवा त्याच्या कुटुंबियांची अपेक्षा नव्हती.