‘हात पसरणे’ हा वाक्प्रचार मराठी भाषेत कोणाकडेतरी याचना करणे अशा अर्थाने उपयोगात आहे. पण मध्यप्रदेशातील बडवानी जिल्हय़ातील ठिकरी या गावच्या लोकांनी या वाक्प्रचाराचा अर्थ सकारात्मक करून दाखविला. या गावातील एका घरातील सैनिक भारतीय सेनेत 21 वर्षे देशसेवा करून गावी परतल्यानंतर त्याचे समस्त गावकऱयांनी मार्गावर आपले हात ‘पसरून’ आणि त्याला त्या हातांवरून चालायला लावून त्याचे अनोखे स्वागत केले.
निर्भय सिंग चौहान असे या सैनिकाचे नाव. त्याने भारतीय सेनेत 21 वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण केला. त्यानंतर तो गावी परतला. त्याचे असे हातांनी स्वागत करण्यात आले. स्वागताच्या या अभिनव पद्धतीने तो अक्षरशः भारावून गेला. गावकरी एवढेच करून थांबले नाहीत. त्यांनी त्याची घोडय़ावरून मिरवणूकही काढली. मिरवणुकीत ढोल, ताशे, डीजे व इतर वाद्ये असा सर्व थाटमाट होताच.
सेनेत हेड काँन्स्टेबल या पदावरून निवृत्त झालेल्या निर्भय सिंग याने नंतर बोलताना, ‘अशा’ स्वागताची मला अपेक्षा नव्हती. गावकऱयांच्या पेमाने मी भारावलो आहे, असे उद्गार काढले. यापुढे गावासाठी आयुष्य वेचण्याचा त्याचा निर्धार आहे.