बेळगाव : वेळ आली होती पण काळ आला नव्हता असाच काहिसा प्रकार हलगा येथे आज घडला. चार ते पाच वर्षाच्या मुलगीचा घरात आलेल्या सापावर पाय पडणार तोच साप मागे सरकला आणि मोठा अनर्थ टळला. हलगा येथे आज सकाळी ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सदर मुलगी बाजूच्याच घरात खेळण्यासाठी जात होती. आणि याच घरात नाग जातीचा साप प्रवेश करता होता. याच दरम्यान ही मुलगी या घरात प्रवेश करताना तिचा पाय या सापावर पडणार होता. मात्र, सापाला याची चाहुल लागली आणि तो मागे सरकला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि केवळ दैव बलवत्तर म्हणून ती मुलगी यातून ती बचावली.
यानंतर सर्पमीत्र रामा पाटील यांना पाचारण करून सापाला पकडण्यात आले आणि त्याला मानवी वस्तीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
सध्या वळवाचे पाऊस सुरु असून झाडे झुडुपे वाढली आहेत. अशावेळी सापही बाहेर पडतात आणि घरांमध्ये शिरत असतात. त्यामुळे नागरिकांची काळजी घेण्याची गरज आहे.