प्रतिनिधी/ बेळगाव
राजस्थानमधील मद्रास रेजिमेंटच्या बारमेर मिलिटरी कॅम्पमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या वाहन अपघातात इदलहोंड (ता. बेळगाव) येथील एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने इदलहोंडवर शोककळा पसरली आहे.
बाळाप्पा तानाजी मोहिते (वय 32) असे त्या दुर्दैवी जवानाचे नाव असून अलीकडेच त्याला हवालदार पदावर बढती मिळाली होती. मद्रास इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये तो सेवा बजावत होता. रात्री मोटारसायकलला अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला.
रविवारी या जवानाचे पार्थिव इदलहोंड येथे पोहोचणार आहे. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे. गेल्या 13 वर्षांपासून तो सैन्यदलात होता. त्याचे शिक्षण अगसगे येथे झाले असून या घटनेने निंग्यानट्टी, शिवापूरसह परिसरातील गावांत शोककळा पसरली आहे.