प्रतिनिधी/ सातारा
जबरी चोरी व अपहरणाच्या गुह्यातील आरोपी 5 तासाच्या आता स्थानिक गुन्हे शाखेने कनार्टक येथून जेरबंद केले आहे. अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. या गुह्यातील दोन संशयित यासिन गुलाब झाडवाले (वय 48), माज यासिन झाडवाले (वय 26, दोघे रा. चिकोडी ता. बेळगाव) यांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. या गुह्यातील दोन संशयित अद्याप फरार आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, प्रिती एक्झीक्युटीव्ह हॉटेल समोर पान टपरीच्या मालाचे पेमेंट देण्यासाठी फिर्यादी साहिल इमाम कोलकर (रा. रविवार पेठ) हे दि. 4 रोजी 12.30 वाजण्याच्या सुमारास गेले होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून ऑरेंज रंगाची स्विफ्ट (क्रं. एम.एच.06.ए.बी.3322) गाडी आली. त्यामध्ये साहिल यांच्या ओळखीचे यासिन गुलाब झाडवाले (वय 48), माज यासिन झाडवाले (वय 26, दोघे रा. चिकोडी ता. बेळगाव) व दोन इसम बसले होते. त्यांनी गाडीतून उतरून साहिल यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. व मोटार सायकलच्या डिग्गीमध्ये असणारे 4 लाख रूपये रोख रक्कम, गळ्यातील दिड तोळे वजनाची सोन्याचे चेन असा एकूण 4 लाख 55 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरी केली. यादरम्यान, साहिल यांचा लहान भाऊ निहाल कोलकर याला स्विफ्ट गाडीमध्ये घालून त्याच अपहरण केले. याबाबतचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाला.
या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी पोलीस अंमलदारांचे पथक तयार केले. या गुह्यातील संशयित यासिन झाडवाले, माज झाडवाले व अन्य दोघे हे स्विफ्ट गाडीतून कोल्हापूरच्या दिशेने पळून गेल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ व त्यांच्या पथकाने तत्काळ पाठलाग सुरू केला. हे तासवडे, किणी, कोगनोळी टोलनाक्यावर माहिती घेऊन त्यांचा चिकोडी (जि. बेळगाव)पर्यत पाठलाग केला. यावेळी पोलिसांनी गाडी स्विफ्ट गाडीला आडवी मारून त्यामधील दोन संशयित यासिन गुलाब झाडवाले, माज यासिन झाडवाले यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी शहर पोलीस ठाण्याकडे देण्यात आले. अपहृत निहाल कोलकर यांची पाच तासाच्या आत सुटका केली.
या कारवाईत सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, पोलीस हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, पोलीस कॉन्टेबल रोहित निकम, विशाल पवार, अनिकेत जाधव यांनी सहभाग घेतला.