सुन्नी दहशतवादी गटांकडून हिंसाचार, शेकडो ठार
काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तान सुन्नी आणि शिया या इस्लाम धर्मातील दोन पंथांमधल्या हिंसाचाराने पुन्हा डोके वर काढले आहे. यात शिया पंथीय असलेल्या हजारा या जमातीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या जमातीच्या लोकांची सरसकट हत्या करण्यात येत असून या जमातीची नवजात बालके आणि महिला यांना विशेषत्वाने लक्ष्य बनविण्यात येत आहे. सततच्या हिंसाचाराने या जमातीचा उच्छेद होण्याच्या मार्गावर आहे, असा अहवाल येथील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कार्यालयाने सादर केला आहे. त्यामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे.
अफगाणिस्तानची लोकसंख्या साधारणतः पावणेचार लाख आहे. यात 9 टक्के लोक हजारा जमातीचे असल्याचे सांगण्यात येते. या जमतीच्या महिला बाळंत झाल्यानंतर त्यांच्या नवजात बालकांची हत्या सुन्नी दहशतवादी गटांकडून होते. तसेच विद्यार्थीनी व महिलांना वेचून ठार केले जाते. या जमातीची लोकसंख्या वाढू नये म्हणून महिलांना लक्ष केले जाते असा आरोप केला जात आहे. शाळा, खेळांचे सामने, विवाह समारंभ आणि कोणत्याही सार्वजनिक स्थानी या जमातीच्या लोकांवर हल्ले केले जातात. त्यांचे संरक्षण करण्यास सरकार व प्रशासन अपुरे पडत आहे. आपल्याला कोणीही वाली उरला नाही, असे या जमातीचे नेते म्हणतात. विश्व समुदायाने याकडे लक्ष द्यावे आणि या जमातीचे संरक्षण करावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि हिंसाचार निर्मूलन संघटनेचे कार्यकारी संचालक वदूद पेद्रम यांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.
1,200 लोकांच्या हत्या
2015 या एकाच वर्षात या जमातीच्या 1,200 हून अधिक लोकांच्या हत्या करण्यात आल्या. या जमातीच्या अनेक वस्त्या आणि महाविद्यालये दहशतवादी हिंसाचाराच्या शिकार बनल्या. जवळजवळ प्रत्येक दिवशी या नागरीकांना लक्ष बनविण्यात येते. त्यांना समूळ नष्ट करण्याची ही योजना आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आल्याने हा जगात चर्चेचा विषय बनला आहे.