इस्लामिक स्टेटमध्ये सामील -भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय
अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेट खुरासान प्रॉविन्सची (आयएसकेपी) सक्रीयता आणि त्यात मोठय़ा संख्येत भारतीय दहशतवाद्यांची उपस्थिती भारताच्या सुरक्षा यंत्रणांसाठी मोठय़ा चिंतेचा विषय ठरला आहे. गुप्तचर यंत्रणांनुसार अफगाणिस्तानात आयएसकेपीशी संबंधित सुमारे 200 भारतीय दहशतवादी आहेत, यात अनेक महिलांचाही समावेश आहे. याचमुळे बहुधा विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला अफगाणिस्तानातील इस्लामिक स्टेटच्या धोक्याबद्दल सतर्क केले हेते.
अफगाणिस्तानात आयएसकेपीमध्ये सक्रीय भारतीय दहशतवादी सातत्याने भारतात दहशतवादी मॉडय़ूल उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील 5 वर्षांमध्ये एनआयएने आयएसशी निगडित सुमारे 12 गुन्हे नोंदविले आहेत. याप्रकरणांच्या तपासादरम्यान आयएसकेपीशी संबंधित अनेक दहशतवाद्यांविषयी माहिती मिळाली आहे. एनआयएकरता वाँटेड असलेल्या दहशतवाद्यांपैकी 25 जण अफगाणिस्तानात असल्याची पुष्टी मिळाली आहे. पण हे दहशतवादी जिवंत आहेत का मारले गेले यासंबंधी कुठलीच माहिती मिळू शकलेली नाही.
अफगाणिस्तानात तळ
अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जानंतर मोठय़ा संख्येत तुरुंगात कैद दहशतवाद्यांची मुक्तता करण्यात आली होती. यात आयएसकेपीचे अनेक दहशतवादी देखील सामील होते. सीरिया आणि इराकमध्ये इस्लामिक स्टेटच्या वतीने लढण्यासाठी भारतातून काही जण गेले होते. पण बगदादी मारला गेल्यावर आणि सीरिया तसेच इराकमध्ये इस्लामिक स्टेटचा खात्मा झाल्यावर त्याच्या दहशतवाद्यांनी विविध देशांमध्ये पळ काढला होता. याचनुसार भारतीय वंशाचे दहशतवादी अफगाणिस्तानात पोहोचले होते. अब्दुल गनी यांचे सरकार असताना भारत या दहशतवाद्यांविषयी माहिती मिळवू पाहत होता आणि यात काही प्रमाणात यश देखील मिळाले होते. पण तालिबानच्या राजवटीत स्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.
सुरक्षा यंत्रणांचे प्रयत्न
आयएसकेपीच्या कारवायांवर नजर ठेवणाऱया अधिकाऱयानुसार दहशतवादी संघटनेच्या सर्व कारवायांची ऑनलाईन माहिती मुनसिब या बनावट नावाने कुणीतरी अपडेट करतो. मूळचा पाकिस्तानचा असणारा कथित मुनसिब अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर सक्रीय असून सुरक्षा यंत्रणा त्याच्यविषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. एनआयएने काही दिवसांपूर्वी भटकळ येथून जुफरी जावहर दामुदीला अटक केली होती. दामुदी इंटरनेट मीडियावर अबु हाजिर अल बदरी नावाने सक्रीय होता आणि व्हॉइस ऑफ हिंद नावाचे बुलेटिन काढत होता. अफगाण-पाक सीमेवर सक्रीय असल्याचा दावा करणारा दामुदी प्रत्यक्षात भटकळ येथे लपून बसला होता. जुफरीसोबत आणखी 10 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती, ज्यात 2 महिलांचाही समावेश आहे.