ऑनलाईन टीम / युएई :
अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि एका ऑईल टँकरवर ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांनी दोन स्फोट घडवून आणले. स्फोटानंतर सर्वत्र आगीचे लोट पसरल्याने विमानतळावरील नवीन बांधकाम स्थळाला आग लागली. मात्र, यात कोणतीही मोठी हानी झाली नाही. या घटनेचा तपास सुरू करण्यापूर्वीच इराण समर्थित ‘हुती” बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेकडून भविष्यातही यूएईवर हल्ले करण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हुती बंडखोरांनी अबु धाबी नॅशनल ऑईल कंपनीच्या पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये पहिला स्फोट घडवून आणला. त्यानंतर दुसरा स्फोट ड्रोनच्या सहाय्याने विमानतळावर घडवून आणला. विमानतळावरील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.