वृत्तसंस्था/ अबु धाबी
28 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान येथे खेळविल्या जाणाऱया चौथ्या अबु धाबी टी-10 क्रिकेट लीगमध्ये जगातील अनेक अष्टपैलू आणि आक्रमक फलंदाज सहभागी होणार आहेत. विंडीजचे ख्रिस गेल, ड्वेन ब्रॅव्हो तसेच पाकचा शाहीद आफ्रिदी यांचा सहभाग निश्चित असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.
ही संपूर्ण स्पर्धा अबु धाबीतील जायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळविली जाणार आहे. टी-20 प्रकारात 1000 पेक्षा जास्त षटकार ठोकणारा विंडीजचा ख्रिस गेल अबु धाबी स्पर्धेतील प्रमुख आकर्षण राहील. पाकचा शाहीद आफ्रिदी कलंदर्स संघाकडून तर ड्वेन ब्रॅव्हो दिल्ली बुल्स संघाकडून खेळणार आहे. पाकचा शोएब मलिक मराठा अरेबियन्स संघाचे तर श्रीलंकेचे टी. परेरा आणि उदाना बांगला टायगर्स संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदा अबु धाबीत टी-10 ही स्पर्धा यापूर्वी खेळविली गेली असून त्याला शौकिनांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेला अमिरात क्रिकेट मंडळ आणि आयसीसीने पूर्ण पाठिंबा दिला आहे.