वृत्तसंस्था/ लंडन
श्रीलंकेविरूद्ध होणाऱया आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक्वीस कॅलीसची फलंदाज सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. उभय संघातील कसोटी मालिकेला 14 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा 45 वर्षीय जागतिक दर्जाचा अष्टपैलू कॅलीसने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत कसोटीमध्ये 55.37 धावांच्या सरासरीने 13206 धावा जमविल्या आहेत. येत्या फेब्रुवारीमध्ये इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱयावर येणार आहे. या दौऱयासाठी इंग्लंड संघासाठी कॅलीसबरोबर फलंदाज सल्लागार करार अद्याप केलेला नाही. गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिका संघाला इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका गमवावी लागली होती. त्यावेळी कॅलीस हा दक्षिण आफ्रिका संघाचा फलंदाज सल्लागार होता. इंग्लंडच्या आगामी लंका दौऱयासाठी साहाय्यक प्रशिक्षक थॉर्पला विश्रांती देण्यात आली असून पॉल कॉलिंगवूडकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ख्रिस सिलव्हरवूड हे इंग्लंड संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहतील.