तळावली येथील प्रकाराने भाजपा कार्यकर्ते संतप्त
प्रतिनिधी / फोंडा
तळावली येथील नाक्यावर लावलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री रवी नाईक, सुभाष शिरोडकर व गोविंद गावडे यांच्या अभिनंदनाच्या फलकाचे विद्रुपीकरण केल्याने स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. महालक्ष्मी युवक संघातर्फे हा अभिनंदनाचा फलक लावण्यात आला आहे.
तळावली येथील प्राथमिक शाळेजवळ लावलेल्या या फलकावर दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींकडून शेण फासण्यात आले होते. मडकई भाजपाचे उमेदवार तथा महालक्ष्मी युवक संघाचे अध्यक्ष सुदेश भिंगी व इतर कार्यकर्त्यांनी लगेच दुसऱया दिवशी विद्रुप केलेला हा फलक पुसून स्वच्छ केला होता. तसेच ज्या कुणी हे कृत्य केले त्यांना सद् बुद्धी दे असे गाऱहाणे देवी महालक्ष्मीला घालण्यात आले होते. मात्र त्याच रात्री पुन्हा आगळीक करीत, हा फलक फाडण्यात आला. या कृतीचा निषेध करताना, मडकई मतदार संघाला मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे चेले वैफलग्रस्त बनले आहेत. या वैफल्यग्रस्त मानसिकतेतूनच हे हीन व अशोभनीय कृत्य केल्याचा आरोप सुदेश भिंगी यांनी केला आहे. फलक फाडल्याच्या या कृतीतून मडकई मतदार संघातील राजकारण किती खालच्या स्थरावर पोचले आहे, याची प्रचिती येते. अशा कृत्यून विरोधकांचे राजकीय इप्सित साध्य होणार नाही, अशी टिकाही त्यांनी केली. मडकई भाजपातर्फे यावेळी पक्षाचा ध्वज उभारण्यात आला.