आगीत रू. 50 लाखाच्या मालमत्तेची हानी, सुदैवाने जीवीतहानी टळली
प्रतिनिधी / फोंडा
तळे-दुर्गाभाट, फोंडा येथे एका बंगल्याला आग लागून सुमारे 50 लाख रूपयांच्या मालमत्तेची हानी झाली. सदर घटना बुधवारी उशिरा रात्री 11 वा. सुमारास उघडकीस आली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नसून वीजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
फोंडा अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार नझरूद्दीन तरनूर नामक व्यवसायिकाचा बंगला आहे. घरात एकूण चार लोक राहत असल्याची मिळाली असून रमजान महिना असल्याने रात्री उशिरापर्यंत सर्वजण जागे असल्याने मोठा अनर्थ टळला. दोन मजली इमारतीत आग पहिल्यांदा वरच्या मजल्यावर पोचली त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची सर्वाधिक झळ घरातील किमती फर्निचरला बसली. सर्व फर्निचर व किमती वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने जळून खाक झाल्या. नुकसानीच नेमका आकडा अजून मिळाला नसल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांनी दिली. फोंडा अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यात यश मिळवले. यावेळी फेंडा अग्निशामक दलाचे दोन बंब व कुंडई येथील एक बंब वापरण्यात आला. फोंडा अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवीदास बायेकर यशवंत गावस, सुभाष नाईक, चंद्रशेखर मडकईकर, गुणुलो परब, देवीदास बायेकर, अवधूत नाईक, वामन गावडे, अब्दूल नडाफ, गौरेश फडते, बाबुशी गावकर यांनी महत्वाचे मदतकार्य करून आग आटोक्यात आणली.