वाई : पसरणी (ता. वाई) येथील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छ. संभाजी महाराज मालिकेतील राणुअक्का फेम अभिनेत्री अश्विनी हिचे वडिल प्रदिपकुमार सदाशिव महांगडे यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी भोर (जि. पुणे) येथील खाजगी रुग्नालयात कोरोनाने निधन झाले.
आ. मकरंद पाटिल यांचे कट्टर सर्मथक व पश्चिम भागाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणुन ते परिचित होते. बी. जी. शिर्के पतसंस्थेचे माजी अध्यक्ष, भैरवनाथ देवालय ट्रस्टचे अध्यक्ष, भैरवनाथ स्कुल कमिटीचे सदस्य, पसरणी विकास सेवा सोसायटीचे माजी सदस्य तसेच विविध संस्था व मंडळांचे आधारस्तंभ होते. त्यांनी विविध मराठी चित्रपटात अभिनय केला होता. तसेच अनेक नाटकांमध्येही भुमिका साकारल्या होत्या. अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले होते. गावामध्ये नाट्यचळवळ रुजविण्यात व जोपासण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सामाजिक, सहकार, शैक्षणिक, राजकिय, कला, क्रिडा क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग असे. त्यांच्या निधनाने गावासह पश्चिम भागावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर भोर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.