वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फ्रान्समध्ये नॅन्टीस येथे सुरू असलेल्या ऍलेक्सीस व्हेस्टीन आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे मुष्टीयोद्धे अमित पांघल आणि संजित यांनी आपल्या वजनगटामध्ये सुवर्णपदके पटकाविली. कोरोना महामारी कालावधीनंतर झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत पांघल आणि संजित व आशिष कुमार यांनी सुवर्णपदके मिळवून भरीव कामगिरी केली.
अमीत पांघलने यापूर्वी विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत रौप्यपदक, आशियाई स्पर्धेत विजेतेपद आणि राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या 52 किलो वजनगटातील अंतिम लढतीत पांघलने अमेरिकेच्या रेनी अब्राहमचा 3-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. 91 किलो वजनगटातील अंतिम लढतीत भारताच्या संजितने फ्रान्सच्या सोहेब बोफियाचा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. 75 किलो वजनगटात भारताच्या आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या आशिषकुमारने सुवर्णपदक पटकाविले. अंतिम लढतीतील त्याचा प्रतिस्पर्धी अमेरिपेचा हिक्सने दुखापतीमुळे माघार घेतली होती. 57 किलो वजन गटात भारताच्या कविंदर सिंगने रौप्यपदक मिळविले. सुवर्णपदकच्या लढतीत फ्रान्सच्या सॅम्युअल किस्टोहॅरीने कविंदर सिंगचा 2-1 असा पराभव केला. या स्पर्धेत भारताने तीन कास्यपदके मिळविली आहेत. 63 किलो गटात शिवा थापा, 81 किलो वजनगटात सुमीत सांगवान आणि 91 किलोवरील गटात सतीशकुमार हे कास्यपदकाचे मानकरी ठरले. गेल्या मार्चमध्ये जॉर्डन येथे झालेल्या ऑलिंपिक पात्रतेच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे पाच पुरूष आणि चार महिला मुष्टीयोद्धय़ांनी टोकियो ऑलिंपिकचे तिकीट आरक्षित केले आहे. सध्या भारतीय मुष्टीयोद्धे सरावासाठी 52 दिवसांच्या युरोप दौऱयावर आहेत.