वृत्तसंस्था/ गुरूग्राम
अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी शनिवारी अदिले सुमारीवाला यांची तिसऱयांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी महिला ऍथलीट अंजू बॉबी जॉर्जची निवड झाली आहे.
शनिवारी येथे अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनची सर्वसाधारण वार्षिक बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीमध्ये सुमारीवाला यांची तिसऱयांदा अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे रविंद्र चौधरी यांची संघटनेच्या सचिवपदी बिनविरोध निवड झाली. सचिवपदासाठी संदीप मेहता यांनी आपला उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतला. मधुकांत पाठक यांची संघटनेच्या खजिनदारपदी बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या या वार्षिक बैठकीमध्ये पाच संयुक्त सचिव आणि आठ कार्यकारी समिती सदस्यांची निवड करण्यात आली.