वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
येथे 31 ऑगस्टपासून खेळविल्या जाणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत कोरोना महामारी समस्येमुळे विविध देशांच्या सीडेड टेनिसपटूंनी माघार घेतली आहे. त्यामुळे यावेळी ही स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान या स्पर्धेत आशिया खंडातील टेनिसपटूंना वाटचाल करताना सत्व परिक्षेला सामोरे जावे लागेल. जपानच्या निशीकोरीने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
या स्पर्धेत आशियातील टेनिसपटूंना दुसऱया आठवडय़ात खेळ करण्यासाठी झगडावे लागेल. जपानची माजी महिला विजेती नागोमी ओसाका हिला चांगली कामगिरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महिला एकेरीत चीनच्या काही टेनिसपटूंना उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता येईल पण पुरूष एकेरीत आशिया खंडातील एकही टेनिसपटू नाही. 2014 साली झालेल्या या स्पर्धेत आशियाई देशाचे प्रतिनिधीत्व करताना जपानच्या निशीकोरीने पुरूष एकेरीत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण त्याला अंतिम फेरीत क्रोएशियाच्या सिलीककडून हार पत्करावी लागल्याने निशीकोरीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
30 वर्षीय निशीकोरीची चालू महिन्यात दोनवेळा कोरोना चांचणी घेण्यात आली होती आणि तो या दोन्ही चांचणीत पॉझिटिव्ह ठरला. दरम्यान तिसऱया चांचणीत निशीकोरी निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. तथापि कोरोनाच्या भीतीमुळे निशीकोरीने या स्पर्धेतून माघार घेतल्याची घोषणा केली.