शॉपमध्ये मोलोटोव्ह कॉकटेलने हल्ला- कर्मचारी जखमी
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन शहरात एका दुकानात बॉटलबॉम्बने हल्ला करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या हल्ल्यामुळे दुकानातील बहुतांश सामग्री जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कुठलीच जीवितहानी झालेली नाही. पण एका व्यक्तीला किरकोळ ईजा झाली आहे.
बॉटल बॉम्ब अत्यंत वेगाने दुकानात फेकण्यात आला होता, त्यानंतर काही सेकंदांमध्ये आग लागली होती. हल्ल्यावेळी दुकानात 2 लोक होते. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक कर्मचारी आगीच्या ज्वाळांदरम्यान बाहेर पडताना दिसून येतो.
हल्लेखोराचा अटक करण्यात आली आहे. 38 वर्षीय जोइल मंगल असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे 2 बॉटल बॉम्ब होते. एक बॉटल बॉम्ब त्याने दुकानात फेकला, तर दुसरा बॉम्ब फेकण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. एका व्यक्तीने त्याला यापासून रोखले होते.
हल्ल्याच्या काही मिनिटातच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली होती. पोलिसांनी हल्लेखोराची चौकशी चालविली आहे. या हल्ल्यामागील उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.