नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय निवडणूक : दोन्ही प्रमुख पक्षांकडून भारतीय वंशीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. रिपब्लिकन पार्टीकडून डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रेटिक पार्टीकडून ज्यो बिडेन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत अमेरिकेतील भारतीय वंशाचे मतदार पाठिंबा देतील तोच उमेदवार निवडून येणार असल्याचे मानले जात आहे. भारतीय वंशीयांच्या मतदारांची संख्या अधिक असलेल्या प्रांतांमध्ये प्रचारावर दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांकडून विशेष भर दिला जात आहे.
अमेरिकेची लोकसंख्या सुमारे 32.82 कोटी असून यात स्थलांतरितांची संख्या 4.5 कोटींच्या नजीक आहे. 2000 साली अमेरिकेत भारतीय वंशीयांची संख्या 16 लाख 78 हजार 765 होती. 2012 मध्ये हे प्रमाण वेगाने वाढून 28 लाख 43 हजार 391 झाले आहे. 2017 मध्ये हा आकडा अधिक मोठा होत 44 लाख 2 हजार 363 वर पोहोचला आहे. 2016 च्या अमेरिकेच्या निवडणुकीत आशियाई वंशाच्या 49.9 टक्के लोकांनी मतदान केले होते. 2016 मध्ये भारतीय वंशीय मतदारांची संख्या 15 लाख होती. 2020 मध्ये हे प्रमाण आणखीन वाढलेले असणार हे निश्चित.
अनेक प्रातांमध्ये लक्षणीय
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत फ्लोरिडा, ओहियो आणि कोलोराडो प्रांत महत्त्वाची भूमिका बजावतात. या प्रांतांमध्ये भारतीय वंशीयांची संख्या लक्षणीय आहे. तेथील भारतीय वंशीय मतदार या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. टेक्सास अमेरिकेतील दुसरा सर्वात मोठा प्रांत आहे. तेथील सुमारे 4 टक्के मतदार आशियाई वंशाचे (2018 च्या आकडेवारीनुसार) आहेत आणि यातील बहुतांशी भारतीय वंशीय आहेत. सद्यकाळात टेक्सासमध्ये काँग्रेसमन (खासदार) आणि गव्हर्नर दोघेही रिपब्लिकन पार्टीचे आहेत. परंतु टेक्सास नेहमीच डेमोक्रेटिक पार्टीचा बालेकिल्ला राहिला आहे.
ट्रम्प यांचे प्रयत्न सुरू
2016 च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या प्रचारादरम्यान ‘अबकी बार ट्रम्प सरकार, आय लव्ह हिंदू, आय लव्ह मोदी’ यासारख्या घोषणा देत भारतीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीयांवर आपले विशेष प्रेम असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी भारतीय वंशीयांना स्वतःच्या प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी दिल्याची आठवण करून दिली आहे. याचप्रकारे डेमोक्रेटिक उमेदवार ज्यो बिडेन यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उपाध्यक्षपदाची उमेदवारी देत भारतीय वंशीयांना स्वतःसोबत जोडून घेण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.
कॅलिफोर्नियात सर्वाधिक
अमेरिकेत कॅलिफोर्निया या प्रांतात सर्वाधिक तर व्योमिंग या प्रांतात सर्वात कमी लोकसंख्या आहे. क्षेत्रफळानुसार अलास्का हा तेथील सर्वात मोठा प्रांत आहे. अमेरिकेत भारतीयांची सर्वाधिक संख्या कॅलिफोर्निया येथे आहे. तर भारतीयांच्या संख्येप्रकरणी न्यूयॉर्क दुसऱया स्थानावर आहे. कॅलिफोर्नियात 5 लाख 28 हजार 176 तर न्यूयॉर्कमध्ये 3 लाख 13 हजार 620 भारतीय आहेत. याचबरोबर टेक्सासमध्ये 2 लाख 45 हजार 981, इलिनॉयसमध्ये 1 लाख 88 हजार 328, फ्लोरिडात 1 लाख 28 हजार 735, व्हर्जिनियामध्ये 1 लाख 3 हजार 916, पेंसिलवेनियामध्ये 1 लाख 3 हजार 26, जॉर्जियामध्ये 96 हजार 116 आणि मेरीलँडमध्ये 79 हजार 51 भारतीयांचे वास्तव्य आहे.