वृत्तसंस्था/ बार्सिलोना
बार्सिलोनाने या संघाचे माजी खेळाडू रोनाल्ड कोमन यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली असल्याचे बुधवारी सांगितले. गेल्या आठवडय़ात झालेल्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील उपांत्यपूर्व लढतीत बायर्न म्युनिचने बार्सिलोनाचा 8-2 असा फडशा पाडला होता. युरोपियन स्पर्धेतील बार्सिलोनाच्या या सर्वात वाईट पराभवानंतर सोमवारी क्विक सेटियन यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. लायोनेल मेस्सी मात्र याच संघात राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
कोमन हे नेदरलँड्स संघाचे मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांनी हे पद सोडून आता बार्सिलोनाशी दोन वर्षाचा करार केला आहे. 1992 मध्ये कोमन बार्सिलोना संघाचे सदस्य होते आणि त्याच वर्षी बार्सिलोनाने युरोपियन चषक स्पर्धेचे पहिले जेतेपद मिळविले होते. त्यांनी नोंदवलेला गोलच निर्णायक ठरला होता. डिफेंडर कोमन नंतर क्लबचे साहाय्यक प्रशिक्षक बनले आणि नंतर प्रमुख प्रशिक्षकपदात कारकीर्द करण्याचे ठरविले.
त्यांनी नेदरलँड्च्या अजॅक्स ऍम्स्टरडॅम, पीएसव्ही इंधोव्हेन, फेयेनार्द या क्लबचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय प्रिमियर लीगमध्ये साऊदम्प्टन व एव्हर्टन आणि ला लिगामध्ये व्हॅलेन्सिया क्लबचे त्यांनी प्रमुख प्रशिक्षकपद भूषविले आहे.