वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेने स्वतःच्या प्रक्षेपित होणाऱया अंतराळयानाला भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव दिले आहे. नॉर्थरोप ग्रुमॅन या अमेरिकेच्या एअरोस्पेस कंपनीने सिग्नस अंतराळयानाला कल्पना चावला यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अंतराळयान 29 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकासाठी झेपावणार आहे.
16 जानेवारी 2003 रोजी कल्पना चावला या कोलंबिया या अमेरिकन अंतराळयानाच्या चालकदलाच्या स्वरुपात अंतराळात जाणाऱया भारताच्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. 01 फेब्रुवारी 2003 रोजी अंतराळात 16 दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यावर परतताना पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करताना वेळ आणि निर्धारित लँडिंगच्या केवळ 16 मिनिटांपूर्वी अंतराळयान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या दुर्घटनेत कल्पना यांच्यासह सर्व अंतराळवीर मृत्युमुखी पडले होते. दुर्घटनेच्या 3 वर्षांनी म्हणजेच 2006 मध्ये भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स यांनी अंतराळवीर म्हणून यशस्वी कामगिरी बजावली होती.
कल्पना चावला यांनी नासामध्ये भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीराच्या स्वरुपात इतिहास रचला आहे. मानवी अंतराळमोहिमेत त्यांच्या योगदानाचा सकारात्मक आणि स्थायी प्रभाव पडला असल्याचे उद्गार नॉर्थरोप ग्रूममॅन या एअरोस्पेस कंपनीने काढले आहेत. मानवी अंतराळयानात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या एका व्यक्तीचे नाव अंतराळयानाला देण्याची कंपनीची परंपरा आहे.
17 मार्च 1962 रोजी हरियाणात कल्पना यांचा जन्म झाला होता. अमेरिकेत त्यांनी एअरोस्पेस इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नासामध्ये काम करण्यास प्रारंभ केला होता. त्यांना सर्वप्रथम 19 नोव्हेंबर 1997 रोजी अंतराळात जाण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या कामाने खुश होऊन नासाने त्यांना पुन्हा 16 जानेवरी 2003 रोजी अंतराळात पाठविले होते.