कोरोना विषाणूमुळे जगभरात 65603 जणांचा मृत्यू : न्यूयॉर्कमध्ये गंभीर संकट, चीनपेक्षा अधिक रुग्ण
जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1214487 वर पोहोचली आहे. तर 65603 जणांना या संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. तसेच 253626 जणांना कोरोना विषाणूपासून मुक्तता मिळाली आहे. अमेरिकेत मागील 24 तासांमध्ये 1224 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर एकूण बळींची संख्या 8454 वर पोहोचली आहे. अमेरिकेतील रुग्णांचा आकडा आता 311637 झाला आहे. देशातील कोरोनाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱया न्यूयॉर्कमध्ये 24 तासांमध्ये 630 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमधील बाधितांचा आकडा 1 लाख 13 हजार 704 आहे. न्यूयॉर्क प्रांतातील रुग्ण तसेच बळींचा आकडा चीनपेक्षा अधिक झाला आहे. आगामी दिवसांमध्ये प्रांतातील संसर्ग टोकाला पोहोचेल असे उद्गार गव्हर्नर अँड्रय़ू क्युमो यांनी काढले आहेत.
2 आठवडय़ात शेकडो बळी जातील
अमेरिकेत आगामी दिवसांमध्ये शेकडो जणांना जीव गमवावा लागणार आहे. या अवघडप्रसंगी मोठय़ा संख्येत सैन्य आणि वैद्यकीय कर्मचाऱयांना तैनात केले जात आहे. ईस्टरच्या सणासंबंधी सोशल डिस्टंसिंगमध्ये काही सूट देण्याची इच्छा आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विस्कॉन्सिन आणि नेब्रास्काकरता आपत्कालीन घोषणांना मंजुरी दिल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. कॅलिफोर्नियात 1 लाख 26 हजार जणांची तपासणी करण्यात आली असून यात 12 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
इटलीत दिवसात 681 बळी
इटलीत कोरोनाचे आतापर्यंत 124632 रुग्ण सापडले आहेत. तर संसर्गामुळे 15362 जण मृत्युमुखी पडले आहेत. इटलीत मागील 24 तासांमध्ये 681 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीच्या नागरी सुरक्षा विभागाचे अध्यक्ष अँजेलो बोरेली यांनी शनिवारी 2886 नवे रुग्ण सापडल्याची माहिती दिली आहे. 29010 जण रुग्णालयात दाखल असून 20996 जण संसर्गातू मुक्त झाले आहेत. इटलीतील गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने रुग्णालयांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. इटलीत मागील काही दिवसांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
स्पेनमध्ये संकट वाढणार
स्पेनमध्ये कोरोना संसर्गामुळे दिवसभरात 809 जणांचा मृत्यू झाला आहे. या युरोपीय देशात आतापर्यंत एकूण 12418 जणांना जीव गमवावा लागला आहे. आगामी दिवसांमध्ये बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर स्पेनच्या पंतप्रधानांनी टाळेबंदी 26 एप्रिलपर्यंत वाढविली आहे. तर देशातील रुग्णांची संख्या इटलीपेक्षा अधिक झाली आहे. स्पेनमध्ये एकूण रुग्णसंख्या 130759 वर पोहोचली आहे. स्पेनमध्ये आता इटलीपेक्षा अधिक रुग्ण झाले आहेत.
जर्मनीत 96108 रुग्ण
जर्मनीत कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत 1444 बळी गेले आहेत. शनिवारी या युरोपीय देशा 169 जणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच दिवसभरात 4933 रुग्णांची भर पडली असून एकूण आकडा 96108 वर पोहोचला आहे. जर्मनीतील संसर्गाचे संकट अद्याप टोकाला पोहोचलेले नाही. आगामी दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येऊ शकते. कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वृद्धी होण्याची भीती व्यक्त होत आहे. जर्मनीत अद्याप टाळेबंदी लागू करण्यात आलेली नाही.
फ्रान्समध्ये 7560 बळी
फ्रान्समध्ये मागील 24 तासांमध्ये 441 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशभरातील बळींचा आकडा 7560 झाला आहे. शुक्रवारी देशात 588 जणांना जीव गमवावा लागला होता. फ्रान्समध्ये सध्या 28 हजार 143 जणांवर उपचार सुरू आहेत. तर सद्यकाळात 89953 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. फ्रान्समध्ये रुग्ण वाढत असल्याने सैन्याची मदत घेण्यात आली आहे. वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्यात येत असली तरीही रुग्णसंख्येत भर पडत असल्याने ती तोकडी ठरत आहे.
तैवानने संसर्ग रोखला
कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्याप्रकरणी तैवानचे धोरण सर्वात प्रभावी ठरले आहे. 25 जानेवारीच्या सुमारास चीन तसेच शेजारच्या अन्य देशांमध्ये संसर्ग वाढू लागला होता. ऑस्ट्रेलिया आणि तैवानमध्ये एकाचवेळी कोरोनाचा रुग्ण समोर आला होता. दोन्ही देशांची लोकसंख्या सुमारे 2.4 कोटीच्या आसपास आहे. दोन्ही देशांनी रुग्ण सापडल्यावर स्वतःची सीमा बंद केली होती. 25 जानेवारीनंतर सुमारे 10 आठवडय़ांमध्ये ऑस्ट्रेलियातील रुग्णांची संख्या 5 हजारावर पोहोचली आहे. तर तैवानमध्ये केवळ 400 रुग्ण आहेत.
चीनमध्ये विदेशी विद्यार्थी अडकले
चीनमध्ये शनिवारी कोरोनाचे 30 नवे रुग्ण सापडले असून दिवसभरात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 19 रुग्ण आढळून आले होते. गरज भासली तरच बाहेर पडा, असे आवाहन वुहानच्या अधिकाऱयांनी केले आहे. दोन महिन्यांच्या टाळेबंदीनंतर शहरातील हालचाली वाढू लागल्या आहेत. चीनमध्ये आतापर्यंत 81669 जणांना कोरोनाची लागण झाली असून 3329 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये 10 लाखांपेक्षा अधिक विदेशी विद्यार्थी अडकून पडले आहेत.
ब्राझीलमध्ये रुग्ण वाढले
ब्राझीलमध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे 1222 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण रुग्णांचा आकडा 10278 वर पोहोचला आहे. तर दिवसभरात 73 जण मृत्युमुखी पडल्याने एकूण बळींचा आकडा 445 झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
युक्रेनमध्ये कोरोनाचा शिरकाव
युक्रेनमध्ये कोरोनाचे 1225 रुग्ण सापडले असून बळींचा आकडा 32 झाला आहे. आतापर्यंत 25 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी व्हेंटिलेटर्स पुरविण्याचे आवाहन युक्रेनने टेस्ला प्रमुख ऍलन मस्क यांना केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत सहकार्य करण्याची तयारी मस्क यांनी दर्शविली आहे.