ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोना लसीच्या मानवी चाचणीत सहभागी असलेल्या व्यक्तीला साईड इफेक्ट दिसून आल्याने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीने आपल्या लसीची मानवी चाचणी तात्पुरती थांबवली आहे. या व्यक्तीला लसीचा डोस दिल्यानंतर साईड इफेक्ट नेमके कशामुळे झाले, याचा वैद्यकीय तपास सुरू आहे.
‘AZD1222’ असे चाचणी थांबवण्यात आलेल्या लसीचे नाव आहे. अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने ही लस तयार केली होती. लसीच्या चाचणीचा पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वीपणे पार पडल्यामुळे ही लस सर्वांत आधी उपलब्ध होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या इतर देशातही सध्या सुरू आहेत.
अमेरिकीन FDA आणि सुरक्षा समितीचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत या लसीच्या चाचणीवर स्थगिती राहणार आहे. भारतातही मागील आठवड्यात मानवी चाचणीत सहभागी असलेली व्यक्ती आजारी पडल्यामुळे ही चाचणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर लसीचे स्वतंत्र परिक्षण घेतल्यानंतर आणि यूकेच्या आरोग्य नियामक मंडळाच्या शिफारशीनंतर या लसीची मानवी चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली.