फ्रीडम डे परेडदरम्यान घटना ः 31 जण जखमी ः 22 वर्षीय संशयिताला अटक
वृत्तसंस्था / शिकागो
अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनी (4 जुलै) शिकागोमध्ये फ्रीडम डे परेडदरम्यान झालेल्या गोळीबाराप्रकरणी 22 वर्षीय संशयित रॉबर्ट ई क्रीमो तृतीयला अटक करण्यात आली आहे. क्रीमो एक रॅपर असून हल्ला केल्यावर तो पलायन करण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी दीर्घ अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला होता. इलेनॉय प्रांताच्या हायलँड पार्कमध्ये झालेल्या गोळीबारात 6 जण मारले गेले असून 31 जण जखमी झाले आहेत.
गोळीबार झाल्याने परेड अर्ध्यावरच रोखण्यात आली. पोलिसांनी स्थानिक लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगितले आहे. हल्लेखोराने एका स्टोअरच्या छतावरून अंदाधुंद गोळीबार केला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी या घटनेप्रकरणी दुःख व्यक्त केले आहे. पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत. हल्लेखोर 18-20 वयोगटातील एक युवक आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक बंदूक हस्तगत केली असल्याची माहिती हायलँड पार्कचे सुरक्षाप्रमुख क्रिस ओ नील यांनी दिली आहे. मागील वर्षी देखील फ्रीडम डे परेडदरम्यान गोळीबाराची घटना घडली होती, तेव्हा 19 जणांना जीव गमवावा लागला होता.
संबंधित हायलँड पार्कमध्ये सुमारे 30 हजार लोकांचे वास्तव्य आहे. येथील लोकांचे उत्पन्न देशातील अन्य लोकांच्या तुलनेत तीनपट अधिक आहे. अमेरिकेत वारंवार होत असलेल्या गोळीबाराच्या घटनांसाठी तज्ञ आता हिंसक व्हिडिओ गेमला जबाबदार मानत आहेत. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध देखील झाले आहे.