जगभरात कोरोना विषाणूचा कहर वेगाने वाढत चालला आहे. या महामारीने अमेरिकाच सर्वाधिक ग्रस्त देश ठरला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कोरोनावरील लस निर्मितीचे प्रयत्न वेगवान केले आहेत. अमेरिकन लसीची चाचणी सध्या तिसऱया टप्प्यात आहे. याचदरम्यान अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कोरोनावरील लसीच्या वितरणाची योजना आखण्यास सुरुवात केली आहे.
ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेच्या प्रांतांना 1 नोव्हेंबरपर्यंत कोरोनावरील संभाव्य लसीच्या वितरणासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी ट्रम्प प्रशासन प्रांतांच्या अधिकाऱयांना 1 नोव्हेंबरर्पंत लस वितरणासाठी अनुमती देण्याची प्रक्रिया जलद करण्याचे आवाहन करत आहे.
ट्रम्प प्रशासनाने प्रांतांच्या गव्हर्नरांना औषधांच्या घाऊक विक्रेत्यांद्वारे वापरल्या जाणाऱया वितरणस्थळांच्या परवान्यासाठीची प्रक्रिया शिथिल करण्यास सांगितले आहे. ऍस्ट्राजेनेकाकडून विकसित करण्यात आलेली कोरोनावरील लस तिसऱया आणि चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सध्या या लसीला मान्यता देण्याच्या प्रक्रियेला अंतिम स्वरुप दिले जात असल्याची घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच केली आहे. तिसऱया टप्प्यातील चाचणीला ऑपरेशन वीवीपी स्पीडच्या हिस्स्यात लागू केले जात आहे. ही अनेक संस्थांची एकत्रित यंत्रणा असून तिच्याकडून लस निर्मितीच्या प्रक्रियेला वेग दिला जात आहे.
सेंटर फॉर डिसिज कंट्रोलचे (सीडीसी) संचालक रॉबर्ट रेडफील्ड यांनी संबंधित अधिकाऱयांना पत्र लिहिले आहे. सीडीसी या वितरण सुविधांच्या वापरात वेग आणण्यासाठी प्रांतांच्या मदतीची विनंती करत असल्याचे रेडफील्ड यांनी पत्रात म्हटले आहे. तत्पूर्वी युएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आयुक्त स्टीफन हॅन यांनी लसीसाठी एक आपत्कालीन प्राधिकरण उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले आहे. एफडीएची लस विषयक सल्लागार समिती विशेष प्राधिकरणवर चर्चा करण्यासाठी 22 ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करणार आहे.
सॅनोफी, जीएसकेच्या लसीचे मानवी परीक्षण
सॅनोफी आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या कंपनीच्या लसीचे मानवी परीक्षण लवकरच सुरू होणार आहे. अमेरिकेत 11 ठिकाणी लसीचे परीक्षण करण्याची योजना कंपन्यांनी आखली आहे. 444 प्रौढांवर लसीची चाचणी केली जाणार असून त्याचे परिणाम डिसेंबरच्या प्रारंभीपर्यंत समोर येणार आहेत. ही चाचणी यशस्वी ठरल्यास त्याच महिन्याच्या अखेरीस व्यापक स्तरावर चाचणी सुरू केली जाणार आहे. 2021 च्या प्रारंभी लस उत्पादनासाठी नियामकीय मंजुरी घेण्याची योजना असल्याचे दोन्ही कंपन्यांनी म्हटले आहे. दोन्ही कंपन्यांनी जुलैमध्ये अमेरिकेच्या प्रशासनासोबत मिळून लसीचे 100 दशलक्ष डोस तयार करण्याची योजना जाहीर केली होती. अमेरिकेच्या प्रशासनाने भविष्यात 50 दशलक्षांपेक्षा अधिक डोस खरेदी करण्याचा पर्याय निवडला आहे. याचबरोबर ब्रिटनचे सरकारही 60 दशलक्ष डोस खरेदी करण्यास तयार आहे.