मोठी दुर्घटना टळली : चौकशीचा आदेश : विरोधकांची सरकारवर टीका
पेडणे / प्रतिनिधी
पत्रादेवी ते धारगळ महाखाजन या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणाऱया एमव्हीआर या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आणि सरकारने त्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अमेरे पोरस्कडे येथे महामार्गाचा सुमारे 80 मीटर भाग कोसळून तेरेखोल नदीत वाहून गेला आहे. सोमवारी पहाटे ही दुर्घटना घडली. या घटनेची गंभीर दखल सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी घेऊन पाहणी केली.
सोमवारी पहाटे हा रस्ता कोसळल्यानंतर पेडणे पोलिसांना या संबधी कोणीतरी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर या ठिकाणी बेरिकेट्स लावण्यात आल्या. तोपर्यंत या रस्त्याने अनेक वाहने गेली. त्यामुळे जर नेमके त्याच वेळी एखादे वाहन या रस्त्यावर आले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.
दोन मंत्र्यांकडून दुर्घटनेची पाहणी
रस्त्याची पाहणी केल्यावर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बांधकाम खात्याचे अभियंते तसेच बांधकाम कंपनीच्या अधिकाऱयांना फैलावर घेतले. ज्या ठेकेदाराने हे काम केले, त्या कामाची पूर्ण चौकशी करावी. तसेच 500 मीटर लांबीचा पूर्ण रस्ता काढून तो परत करावा. आपल्याला ठेकेदाराच्या कामाचा पूर्ण अहवाल सादर करावा अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांना केली आहे. कोकण रेल्वे पुलाच्या जवळच 70 ते 80 मीटरचा हा रस्ता नदीच्या पात्रात गेल्याने ठेकेदाराच्या कामाचा दर्जा दिसून येतो.
रस्त्याची पाहणी करतेवेळी मुख्य अभियंते कुलकर्णी, अभियंते नारायण मयेकर, कन्सल्टंट यादव, माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर, मंदार परब, प्रेन्की परेरा, माजी सरपंच पल्लवी राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर गोवा सरचिटणीस संजय बर्डे, श्रीकृष्ण हळदणकर, पंचसदस्य श्री. महाले, गजेंद्र गडेकर, मनोहर नाईक, प्रकाश कांबळी, सुनील नाईक, नारायण तळकटकर आदी उपस्थित होते.
अमेरे पोरस्कडे या भागातून जात असलेला राष्ट्रीय महामार्ग हा तेरेखोल नदी पात्राला लागून जात असल्याने गेल्यावषी याच ठिकाणी काही अंतरावर संरक्षण भिंत कोसळून रस्ता नदी पात्रात गेला होता, असे गजेंद्र गडेकर तसेच उपस्थित नागरिकांनी उपमुख्यमंत्री आजगावकर यांच्या लक्षात आणून दिले.
नदीपात्राच्या बाजूने काँक्रीटची भव्य भिंत उभारावी आणि मगच रस्त्याचे काम हाती घ्यावे, असा आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.