सोमवारी वास्कोत तीन बळी : 130 नवे रुग्ण : 53 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / पणजी
राज्यात काल सोमवारी कोरोनाचे तीन बळी गेल्याने आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 17 झाली आहे. सोमवारी नवे 130 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून 53 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.
आरोग्य खात्याच्या सचिव निला मोहनन, संचालक ज्योस डिसा, डॉ. उत्कर्ष बेतोडकर तसेच डॉ. सुनंदा आमोणकर यांनी पणजीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोना परिस्थितीचा तपशील सादर करण्यात आला.
सक्रिय रुग्णांची संख्या 1043 वर
काल सोमवारी नव्याने मिळालेल्या 130 कोरोना रुग्णांमध्ये टय़ुबिज डायग्नोस्टिक औषध कंपनीच्या 54 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत मिळालेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2583 असून 1540 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा पार केला असून ही संख्या 1043 वर पोहोचली आहे, असे त्यांनी सांगितले.
आतापर्यंतच्या बळीमध्ये 12 पुरुष, 5 महिला
कोरोना आजारातून बरे होण्याची सरासरी 59.6 टक्के आहे तर मृत्यू दर 0.61 टक्के आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या 17 रुग्णांमध्ये 12 पुरुष तर 5 महिला आहेत. 14 जणांचा कोविड इस्पितळ, मडगाव येथे मृत्यू झाला तर 3 जणांचे इतरत्र निधन झाले, अशी माहिती देण्यात आली.
कोरोनाच्या बळींना होते आणखी आजार
कोरोनाचे बळी ठरलेल्या अनेक रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर काही आजार होते, असा दावा डॉक्टरांनी केला. त्यातच कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे स्पष्टीकरण देण्यात आले. आतापर्यंत 400 हून अधिक रुग्णांना कोविड इस्पितळात दाखल करण्यात येऊन बरे झाले तसे त्या रुग्णांना घरी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. आमोणकर यांनी दिली.
गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या 9 बसगाडय़ा आरोग्य खात्याने ताब्यात घेतल्या असून नव्याने सापडलेल्या कोरोना रुग्णांची वाहतूक त्यातून केली जाणार आहे. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
डॉ. एडविन गोम्सही कोरोनाग्रस्त
प्रतिनिधी / मडगाव
मडगावच्या कोविड हॉस्पिटलात तब्बल 98 दिवस कोरोनाबाधित रूग्णांची सेवा करणारे डॉक्टर एडविन गोम्स हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना सद्या कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली आहे. डॉ. गोम्स कोरोनातून लवकर बरे व्हावे यासाठी काल राज्यभरातून अनेकांनी देवाकडे प्रार्थना केली आहे.
कोविड हॉस्पिटल स्थापन केल्यानंतर डॉ. एडविन गोम्स यांच्याकडे या हॉस्पिटलचा ताबा देण्यात आला होता. या ठिकाणी त्यांनी अनेक कोरोना ग्रस्त रूग्णांवर उपचार करून त्यांना बरे केले होते. त्यांच्याकडे ताबा असताना कोविड हॉस्पिटलात सुसज्जता होती. त्यांच्या हाताखाली काम करणाऱया चार ज्युनियर डॉक्टरांनी देखील बऱयापैकी सेवा दिली होती. त्यांच्या टिमने 98 दिवसानंतर ब्रेक घेतला व ते आपल्या घरी गेले.
डॉ. गोम्स यांनी कोरोनाची चाचणी घेतली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले. हे वृत्त वाऱयासारखे संपूर्ण गोव्यात पसरल्याने अनेकांना धक्काच बसला. डॉ. गोम्स यांनी काल सोमवारी उशिरा गोमेकॉत जाऊन एक्स-रे काढून घेतला. ते एक्स-रे काढण्यासाठी मडगावला येणार अशी माहिती मिळाल्याने कोविड हॉस्पिटलमध्ये सर्व तयारी करून ठेवली होती. पण, त्यांनी गोमेकॉत जाणे पसंत केले.
डॉ. गोम्स जेव्हा आपल्या घरी गेले होते, तेव्हा दोन्ही मुलींनी त्यांना मिठी मारली होती. तसेच इतरांनी जोरदार स्वागत केले होते. तेच आत्ता पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबातील इतर सदस्यांची चाचणी करणे क्रमप्राप्त ठरले आहे.
वास्कोत सोमवारी तिघांचे मृत्यू : वास्कोवासियांना हवे पुन्हा लॉकडाऊन
प्रतिनिधी / वास्को
वास्कोत पुन्हा काल सोमवारी तिघांना कोरोनामुळे मृत्यू आला. कोरोनामुळे मृत्यू आलेल्या वास्कोतील व्यक्तींची संख्या आता अकरा झाली आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या मृत्यूमुळे वास्को परिसरात चिंता पसरलेली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनची मागणी वास्कोत पुन्हा होऊ लागलेली आहे.
वास्कोत आतापर्यंत नगरसेवक पास्कॉल डिसोजा यांच्यासह खारवीवाडा भागात अन्य दोघांना कोरोनामुळे मृत्यू आला होता. त्यानंतर नवेवाडे, बायणा, रूमडावाडा जेटी तसेच चिखली येथील भागातील वृध्द महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. शनिवारी एकाच दिवशी तिघांना मृत्यू आला होता. तशाच प्रकारे काल सोमवारी एकाच दिवसात पुन्हा वास्कोतील तिघांना कोरोनामुळे मृत्यू आला.
वरुणापुरीतील रुग्णाला दाखल करताच मृत्यू
वरूणापुरी भागातील एका केंद्रीय संस्थेचा कर्मचारी असलेल्या 58 वर्षीय व्यक्तीचा काल सोमवारी मृत्यू झाला. मयताचे नाव रत्नाकर बिकानवर असे असून त्याला सोमवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमधील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्ती काही शारीरिक विकारांवर खासगी उपचार घेत होती. प्रकृती खालावल्याने त्याला सोमवारी सकाळी तातडीने चिखलीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे दाखल करताच त्याला मृत घोषित करण्यात आले. या ठिकाणी मयताची कोविड चाचणीही करण्यात आली. त्यात मयत कोरोना पॉझिटिव्ह होता असे उघडकीस आले. रात्री साडेसातच्या सुमारास मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
बेलाबाय येथेही आजारी असलेल्याचा बळी
बेलाबाय वास्कोतील स्थानिक नागरिक लक्ष्मण गडेकर या साठ वर्षीय व्यक्तीचा मडगावच्या कोविड हॉस्पिटलात सोमवारी सकाळीच मृत्यू झाला. मयत व्यक्ती निवृत्त नौदल कर्मचारी होती. त्यालाही अन्य शारीरीक विकार होते. या गडेकर कुटुंबातील एकूण पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. पैकी चारजण अद्यापही कोविड कॅअर सेंटरमध्ये आहेत.
सोमवारी मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मृत्यू आलेली तिसरी वास्कोतील व्यक्ती 47 वर्षीय महिला असून तिलाही शारीरिक विकार होता. ती मांगोरहिल येथील एका इमारतीत कुटुंबीयासमवेत राहात होती. मयत महिलेचे नाव मिरा शर्मा असे आहे. तिचे पती डॉक्टर असून नौदलाच्या सेवेतून ते निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या दोन मुलीही डॉक्टर आहेत. या तिघांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.
लॉकडाऊन जाहीर करण्याची नगरसेविकेची मागणी
दरम्यान वास्कोत कोरोना बाधीतांची वाढती संख्या आणि वाढत असलेल्या मृत्यूमुळे चिंता पसरलेली आहे. एकमेकांबद्दल संशय आणि भिती असे वातावरण वास्कोत निर्माण झालेले आहे. वास्कोतील या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी वास्कोत किमान आठ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करावा अशी मागणी नगरसेविका रोचना बोरकर यांनी केली आहे.
नगरसेविका रोचना बोरकर व त्यांचे पती गिरीष बोरकर या दोघांना कोरोना झाला होता. साधारण पंधरा दिवस कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेऊन ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. सोमवारी वास्कोतील तिघांचा मृत्यू झालेल्या पैकी दोघे जण त्यांच्या प्रभागातील व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांनी भिती व्यक्त केली आहे. वास्कोतील परिस्थिती दिवसेदिवस गंभीर वळण घेत असून हे रोखण्याची गरज आहे. सद्यस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी किमान आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्याची गरज आहे. एक प्रयत्न म्हणून सरकारने वास्को लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा किंवा स्थानिक नागरिकांनीच असा निर्णय घ्यावा अशी मागणी नगरसेविका रोचना बोरकर यांनी केली आहे.
मुरगावचे नगराध्यक्ष पुन्हा सेवेत रूजू मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी काल सोमवारी सेवेत रूजू होऊन कामकाजाला सुरवात केली. मुरगावचे नगरसेवक व पालिका कर्मचाऱयांनी त्यांचे पालिका कार्यालयात स्वागत केले. जवळपास महिनाभरापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना हेडलॅण्ड सडय़ावरील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे लागले होते. तेथून बाहेर पडल्यानंतर चौदा दिवस ते घरीच क्वारंटाईन होते. रविवारी त्यांनी खारवीवाडा कंटेनमेंट झोनची पाहणी केली होती. त्यांच्या प्रभागातील काही अनावश्यक भाग कंटेनमेंट झोनमध्ये समाविष्ठ पेलेला असून तो भाग कंटेनमेंट झोनमधून वगळण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.