भाजपचे तीन उमेदवार स्वतःचेच डमी : दोघांच्या पत्नींची उमेदवारी, इजिदोर अपक्ष
प्रतिनिधी /पणजी
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या काल सोमवारी दुसऱया दिवशी एकुण 18 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी अर्ज भरणाऱया तिघांसह एकूण अर्जदार 21 वर पोहोचले आहेत.
सोमवारी अर्ज दाखल करणाऱयांमध्ये डिचोलीतून नरेश सावळ (मगो), थिवीतून नीळकंठ हळर्णकर (भाजप-2 अर्ज), पर्वरीतून रोहन खंवटे (भाजप) आणि नीलम खंवटे (भाजप), हळदोणेतून पूजा मयेकर (अपक्ष), प्रियोळमधून दीपक ढवळीकर (मगो), शिरोडामधून सुभाष शिरोडकर (भाजप-2 अर्ज), मडकई मतदारसंघातून सुदिन ढवळीकर (मगो), मुरगावातून संकल्प आमोणकर (काँग्रेस) आणि श्रद्धा आमोणकर (काँग्रेस), दाबोळीतून माविन गुदिन्हो (भाजप-2 अर्ज), कुठ्ठाळीतून विशाल नाईक (अपक्ष), कुडचडेतून अजय बोयेर (अपक्ष) आणि काणकोणमधून इजिदोर फर्नांडीस (अपक्ष) यांचा समावेश आहे.
दोघांच्या पत्नींची उमेदवारी
या 21 अर्जदारांमध्ये आश्चर्यकारकरित्या भाजपच्याच तीन उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत, तर रोहन खंवटे यांनी पत्नीचीही उमेदवारी दाखल केली आहे. तोच प्रकार मुरगावातून दिसून आला असून काँग्रेसच्या संकल्प आमोणकर यांनीही पत्नीची उमेदवारी दाखल केली आहे. अन्य उमेदवारांमध्ये मगोतर्फे तिघे तर माजी उपसभापती इजिदोर फर्नांडीस यांच्यासह इतर अपक्षांचा समावेश आहे.
उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी तिघांनी अर्ज दाखल केले होते. त्यात प्रियोळमधून गोविंद गावडे (भाजप), नावेलीतून दिग्वित चौहान (अपक्ष) आणि कुडचडेतून नीलेश काब्राल यांचा समावेश होता.
पुढील तीन दिवसात वाढणार उमेदवारांची गर्दी
दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी तांत्रिकदृष्टय़ा जरी आठ दिवस (21 ते 28 जानेवारी) देण्यात आलेले असले तरी मध्ये शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताक दिवस अशा तीन सुट्टय़ा आल्यामुळे प्रत्यक्षात उमेदवारांना केवळ पाचच दिवस मिळणार आहेत. त्यामुळे आज दि. 25, गुरूवार 27 आणि शुक्रवार दि. 28 या तीन दिवसात उमेदवारांची गर्दी उसळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.