श्रीपाद नाईक पोहोचले दिल्लीला : नड्डांनंतर अमित शहानांही भेटणार
प्रतिनिधी /पणजी
कुंभारजुवे उमेदवारी प्रश्नावरुन भारतीय जनता पार्टीमध्ये जोरदार संघर्ष निर्माण झाले असून हा प्रश्न आता पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या न्यायालयात पोहोचला आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे दिल्लीला गेले असून त्यांनी आपली कैफियत नड्डांसमोर मांडली.
भारतीय जनता पार्टीमध्ये कुंभारजुवे उमेदवारी प्रश्नावरुन निर्माण झालेले वादळ शमण्याची शक्यता नाही. भाजपच्या उमेदवारीसाठी तीन ते चारजण इच्छूक असून सर्वांनी एकमेकांविरुद्ध कुरघोडी केली आहे. अद्याप आजारातून पूर्णतः बरे झालेले नसलेले विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी केलेले प्रयत्न निष्पळ ठरल्यानंतर पक्षाने त्यांना त्यांची पत्नी जनिता मडकईकर यांनाच उमेदवारी देण्याचा प्रस्ताव पक्षासमोर ठेवला आणि पक्षाने तो तात्काळ स्वीकारला देखील.
श्रीपाद नाईक प्रचंड नाराज
रोहन हरमलकर या कार्यकर्त्याने देखील गेले दोन वर्ष जोरदार फिल्डिंग लावली होती आणि आयत्या वेळी त्यांचे नाव स्थगित ठेवले. गेली चार वर्षे प्रतिक्षा यादीत असलेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र एकाच घरात एकापेक्षा जास्त पदे नकोत व सिद्धेश नाईक हे जिल्हा पंचायत सदस्य असल्यामुळे त्यांची उमेदवारी स्थगित केली. यामुळे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे देखील प्रचंड नाराज झाले आहेत.
श्रीपाद नाईक काल सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. रात्री त्यांनी बराचवेळ भेटून जे. पी. नड्डा यांच्याबरोबर चर्चा केली. यातून नेमके काय निष्पण झाले ते समजले नाही मात्र गरज पडल्यास श्रीपाद नाईक हे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटणार आहेत. कुंभारजुवे प्रकरणी भाजपमध्ये एकून तीन गट निर्माण झालेले आहेत. त्यातील आतापर्यंत दोघांनी तरी अपक्ष निवडणूक लढविण्याची देखील तयारी केली आहे. केवळ उमेदवाराच्या घोषणेची हे सर्वजण वाट पाहत आहेत.