वृत्तसंस्था / ब्युनोस आयर्स
आगामी फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी सुरू असलेल्या दक्षिण अमेरिकन पात्र फेरीच्या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाने शुक्रवारी व्हेनेझुएलाचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. कतारमध्ये होणाऱया आगामी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेनंतर मेसी आपल्या कारकिर्दीबाबत फेरविचार करून निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कतारमध्ये 2022 सालातील फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान होणार आहे. येत्या जूनमध्ये मेसी 35 व्या वर्षांत पदार्पण करणार आहे. गेल्यावर्षी मेसीने अर्जेंटिना संघाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे पहिले अजिंक्यपद मिळवून दिले होते. या स्पर्धेत अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात ब्राझीलचा पराभव केला होता.
शुक्रवारच्या सामन्यात 35 व्या मिनिटाला निको गोंझालेझने अर्जेंटिनाचे खाते उघडले. 79 या मिनिटाला अर्जेंटिनाचा दुसरा गोल अँजेल डी मारियाने नोंदविला. कर्णधार मेसीने तिसरा गोल नोंदवून अर्जंटिनाच्या विजयावर शिकामोर्तब केला. दक्षिण अमेरिकन पात्रफेरी स्पर्धेतून ब्राझील, अर्जेंटिना, इक्वेडोअर आण उरूग्वे या चार संघांना आगामी विश्व़करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी थेट प्रवेश यापूर्वीच मिळाला आहे.
या पात्र फेरी स्पर्धेच्या गुणतक्त्यात पेरूने 21, कोलंबियाने 20 तर चिलीने 19 गुण मिळविले आहेत. येत्या मंगळवारी या विभागातून पाचव्या स्थानासाठी शेवटच्या फेरीतील सामने खेळविले जातील. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या शेवटच्या 16 संघात स्थान मिळविण्यासाठी झालेल्या लढतीमध्ये मेसी आणि ब्राझीलचा नेम्मार यांच्या फुटबॉल क्लबना रियल माद्रीदकडून पराभव पत्करावा लागल्याने या दोन्ही आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंना टीकेला सामोरे जावे लागले होते.