प्रतिनिधी/बेळगाव
खडेबाजार शहापूर येथील रस्ता स्मार्ट बनविण्यासाठी खोदण्यात आला आहे. पण येथील काम अर्धवट असल्याने हा रस्ता आता भकास बनला असून ठिकठिकाणी उघडय़ावर सोडण्यात आलेल्या लोखंडी सळय़ा नागरिकांसाठी जीवघेण्या बनल्या आहेत. त्यामुळे रखडलेल्या कामामुळे व्यापारी, रहिवासी आणि वाहनधारक हैराण झाले आहेत.
स्मार्ट शहर बनविण्यासाठी विविध रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. पण सदर कामे कुर्मगतीने सुरू असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. खडेबाजार रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी दुतर्फा गटारीकरिता पाईप घालण्यात आल्या आहेत. पण काही ठिकाणी संपर्क रस्ते असल्याने त्या ठिकाणी सीडी घालण्यात आल्या आहेत. सध्या मीरापूर गल्लीला जाणाऱया रस्त्यावर सीडी घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. पण या ठिकाणी पाईप ठेवण्यात आल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण झाला आहे. पाईप घालण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही या ठिकाणी पाईप ठेवण्याची गरज काय? असा प्रश्न वाहनधारक आणि व्यापारीवर्गातून उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे येथील पाईप हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
लोखंडी सळय़ा बनल्या जीवघेण्या
तसेच कचेरी गल्लीला जाणाऱया रस्त्यावर सीडी घालण्यासाठी लोखंडी सळय़ा सोडण्यात आल्या आहेत. पण सदर काम कित्येक महिन्यांपासून बंद आहे. परिणामी येथे ये-जा करणाऱया नागरिकांना उघडय़ावर सोडलेल्या लोखंडी सळय़ा जीवघेण्या बनल्या आहेत. या ठिकाणी भाजी विपेते व फळ विपेते बसलेले असतात. तसेच रात्रीच्यावेळी सळय़ांचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्याने अपघात देखील होत आहेत.
खडेबाजार रोडवर चिखलाचे साम्राज्य तसेच काही दुकानांसमोर चेंबर केले असून त्यावर काँक्रिट घालण्यात आले नाही. त्यामुळे दुकानांमध्ये येणाऱया ग्राहकांना धोकादायक बनले आहे. तसेच रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी खोदून ठेवण्यात आल्याने संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. ठिकठिकाणी मातीचे ढिगारे ठेवण्यात आले असून पावसामुळे शहापूर खडेबाजार रोडवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा फटका व्यावसायिक, रहिवासी आणि वाहनधारकांना बसत आहे. त्यामुळे रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.