कोलकाता : गेल्या आठवडय़ात झालेल्या ऑनलाईनवरील आशियाई कनिष्ठांच्या बुद्धिबळ स्पर्धेत कोलकाताची महिला बुद्धिबळपटू अर्पिता मुखर्जीने कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत पदक मिळविणारी अर्पिता हे एकमेव भारतीय स्पर्धक आहे.
सदर आशियाई कनिष्ठांची स्वीस बुद्धिबळ स्पर्धा नऊ फेऱयांची खेळविली गेली. खुल्या विभागात कोलकात्याची आंतरराष्ट्रीय मास्टर मित्रबा गुहाने पाच गुणांसह नववे स्थान मिळविले. या स्पर्धेत आशिया खंडातील 43 देशांचे सुमारे 200 बुद्धिबळपटू विविध वयोगटात सहभागी झाले होते. 19 वर्षीय अर्पिताने या स्पर्धेत समाधानकारक कामगिरी केली. राष्ट्रीय मुलींच्या स्पर्धेत 19 वर्षांखालील भारतीय कनिष्ठांच्या विभागात ती तिसऱया क्रमांकासाठी पात्र ठरली.
अर्पिताने या स्पर्धेत सहा सामने जिंकले असून दोन सामने गमविले तर एक सामना बरोबरीत राखला. तिने नऊपैकी 6.5 गुण घेत तिसऱया स्थानासह कांस्यपदक घेतले. या स्पर्धेत अर्पिताला मंगोलियाच्या तुरमुख बरोबरच्या लढतीत हार पत्करावी लागली. हा सामना अर्पिताने जिंकला असता तर तिला रौप्य किंवा सुवर्णपदक मिळविता आले असते. गेल्यावर्षै अर्पिताने महिला ग्रॅण्ड मास्टर नॉर्मची संधी गमविली होती.